वैजापूर तालुक्याला अतिवृष्टी नुकसानीची भरपाई नाही ; शेतकऱ्यांमध्ये संताप

वैजापूर तालुक्याला अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईतून वगळले

जफर ए.खान 

वैजापूर, ३० नोव्हेंबर :-

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर/ ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाने एकूण 268 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे वितरण सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे नुकसान भरपाई देतांना वैजापूर तालुक्याला यातून वगळण्यात आले आहे. नुकसान भरपाईतून वगळण्यात आल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप पहायला मिळत आहे.

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी होऊन मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान  झाले. त्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असून नुकसान भरपाईपोटी औरंगाबाद जिल्हयाला 268 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपये मंजूर करण्यात आले आहे. मात्र या नुकसान भरपाईतून वैजापूर तालुक्याला भोपळा मिळाला आहे. तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले. स्थानिक प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामेही केले. मात्र पिकांच्या नुकसानीची भरपाई देतांना वैजापूर तालुक्याला त्यातून वगळण्यात आले.

वैजापूर तालुक्याला अतिवृष्टीचे नुकसान शून्य

वैजापूर  तालुक्यात सप्टेंबर/ ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे सादर करून 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळपिके सोडून जिरायत पिकांखालील बाधित क्षेत्राची माहिती दिली आहे. त्यानुसार वैजापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 1,35,182 असून त्यांच्या एकूण 82 हजार 262 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये सोयाबीन 2,811हेक्टर, कापूस 48 हजार 906 हेक्टर, उडीद 48 हेक्टर, मका 28 हजार 623 हेक्टर,बाजरी 283 हेक्टर, तूर 1494 हेक्टर व मूग 97 हेक्टर चा समावेश आहे.  या नुकसान भरपाई पोटी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 111 कोटी 87 लाख 63 हजार 200 इतका निधी अपेक्षित आहे. मात्र नुकसान भरपाई देतांना शासनाने वैजापूर तालुक्याला त्यातून वगळले आहे. पिकांच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्यामुळे तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देण्यात यावा. मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये अशी मागणी माजी  नगराध्यक्ष साबेरखान अमजदखान यांनी केली आहे.