बाबा रामदेव पुन्हा बरळले, अमृता फडणवीस यांच्या समोर केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

ठाणे  , २५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- बाबा रामदेव आणि वाद हे आता समीकरणच झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी काहीपण बरळून वाद ओढवून घेण्याची जणू त्यांना सवयच झाली आहे. पतंजलि योगपीठ आणि मुंबई महिला पतंजलि योग समिती आयोजित विज्ञान शिबिर आणि महिला मेळावा दरम्यान बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाचे आता पडसाद पडू लागले आहेत.

नेमकं काय म्हणाले बाबा ?

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातल तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी मंचावरून केले. पतंजली योग पीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी ठाण्यातील हायलँड परिसरात योग विज्ञान शिबिर आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव महिलांशी संवाद साधत होते.