विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुणे , २५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. विक्रम गोखले आता हळूहळू डोळ्यांची हालचाल करत असल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरिश याडगीकर यांनी दिली आहे.

७७ वर्षीय विक्रम गोखले मागील १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल आहेत. बुधवारी त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. आता रुग्णालयाने त्यांचे हेल्थ बुलेटिन जारी केले आहे. विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असून त्यांनी डोळे उघडले आहेत. पुढील ४८ तासांत त्यांचा व्हेंटिलेटर काढला जाऊ शकतो. तसेच बीपी आणि हृदयाची क्रिया सुरळीत सुरू आहे, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

५ नोव्हेंबरपासून विक्रम गोखले पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले होते. अजय देवगण, रितेश देशमुख, नवाजुद्दीन सिद्दीकी, मधुर भंडारकर यांच्यासह अनेक हिंदी सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली होती. पण विक्रम गोखले यांच्या पत्नी आणि मुलीने हे वृत्त फेटाळून लावले होते. विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे म्हटले होते. तर ते कोमात नसल्याचे त्यांच्या पत्नी वृषाली यांनी सांगितले होते.