गंगापूरच्या ट्रॉमा केअर सेंटरची अर्धवट इमारत पडली धूळखात

गंगापूर ,२५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-गंगापूर शहर व परिसरात गेल्या काही महिन्यात रस्ते अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यास मर्यादा येत असल्याने रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर युनिटचे प्रलंबित काम पूर्ण करून रुग्णसेवेसाठी तो खुला करावा अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने करण्यात येत आहे.

औरंगाबादहून नाशिक मुंबईकडे जाण्यासाठी वाहनधारक वैजापूर -गंगापूर मार्गाचा पर्याय निवडत असल्याने या मार्गावर चार चाकी वाहनांच्या रहदारीत काही महिन्यापासून लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण महामार्ग सुरक्षा पोलिसांनी नोंदवले आहे. त्यात गंगापूर हद्दीत वरखेड फाटा, शिंगी पाटी, मालगाव हे अपघाताचे ब्लॅक स्पॉट असून वर्षभराच्या आत या महामार्गावर दहापेक्षा जास्त प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे २० ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या गत एक महिन्याच्या कालावधीत वैजापूर मार्गावरील १२ किलोमीटर अंतरात झालेल्या विविध अपघातात तीन जणांनी आपला जीव गमावला असून अनेक लहान मोठे अपघात प्रवाशांना अपंगत्व आले आहे यातील बऱ्याच अपघातांची नोंद होत नाही तसेच कित्येक अपघात ग्रस्ताना वेळेवर उपचार मिळत नसल्याने खाजगी रुग्णालय किंवा औरंगाबादची वाट धरावी लागत आहे. गंगापूर परिसरात दोन वेगवेगळ्या महामार्गावर शनिवारी १९ व दिनांक २० रोजी सलग झालेले अपघातात पाच जणांनी आपला जीव गमवावा लागला. तर पंधरा पेक्षा जास्त जखमी झाले मात्र उपजिल्हा रुग्णालयात पुरेशी सुविधा नसल्याने जखमींना इतरत्र हलवण्यात आले यानिमित्ताने येथील ट्रॉमा केअर सेंटरचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.