‘बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी शिकवू नये’ मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई ,२४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी वेळ पडल्यास महाराष्ट्र बंदचही हाक देऊ, असा इशारा दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे. 

या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं भाजप-शिवसेना सरकार काम करत आहे, त्यामुळे काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, छातीत धडकी भरली आहे. त्यातूनच असे प्रकार पुढे येत असल्याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार बाळासाहेबांचे विचार मोडून तोडून टाकणाऱ्यांना नाहीत, सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं.