कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना काय महाराष्ट्र असा-तसा वाटला का? – अजितदादा पवार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध व्यक्त करतो

मुंबई ,२४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची गेले दोन दिवस जी काही वक्तव्य येत आहेत, त्याबाबत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त करत तुम्ही महाराष्ट्र मागायला निघाले आहेत का, त्यांना काय महाराष्ट्र असा-तसा वाटला का? असा संतप्त सवाल अजितदादांनी केला. वास्तविक काही कारण नसताना त्यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांबद्दल वक्तव्य केले आणि त्याच्यावर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कोलकोट तालुक्यातील गावांबद्दल वक्तव्य केले. सातत्याने बघतोय की, काहीही कारण नसताना अशा प्रकारची वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबतीत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी ठाम भूमिका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपाचे आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात अशी वक्तव्य होत नव्हती. आता फक्त मुंबईच मागायची बाकी राहिली आहे की काय कळत नाही. महाराष्ट्रातील जनता हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणाच्या भानगडीत पडू नये, अशा इशाराही अजितदादांनी यावेळी दिला. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. सीमाप्रश्नाबाबत सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. याबाबत सुप्रीम कोर्ट भूमिका मांडेल आणि महाराष्ट्र राज्यही आपली भूमिका मांडेल आणि त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी होईल. परंतु अशा प्रकारचे कधी राज्यातील जत तालुक्यातील गावांबाबत तर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटाबाबत विधान करायची हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब थांबवले पाहिजे, असे मत अजितदादा यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धेला खतपाणी

आपण का अंधश्रद्धेला खतपाणी घालतोय मला समजत नाही. प्रत्येकाची कुठेना कुठे निष्ठा असते याबाबत दुमत नाही. जे वृत्त वाचण्यात आले, याबाबत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, असे मत अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना विज्ञान काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दात अजितदादा पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

लोकांचे लक्ष बेरोजगारी व महागाईवरून हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. राज्याच्या अस्मितेचा व एकतेचा प्रश्न असतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश आणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांनी व राज्यकर्त्यांनी तेव्हापासून महाराष्ट्राला एकसंध, एकजूट ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मातृभाषेला महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. असे प्रयत्न होत असताना आता कोणतेही कारण नव्हते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे हे तपासण्याची वेळ आलेली आहे. याबाबत राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका अजितदादा यांनी मांडली.