वैजापुरात मारुती सुझुकीच्या शोरूमला आग ; जिवीतहानी नाही

वैजापूर, २४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यावरील मारुती सुझुकीच्या शोरुमला बुधवारी सकाळी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना उघडकिस आली.  अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवित हानी झाली नाही. मात्र, आगीत मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शहरातील स्टेशन रोड परिसरातील सेंट मोनिका शाळेसमोर असलेल्या मारुती सुझुकी शोरुमला आग लागल्याची घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. आग लागल्याचं लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मोठ्या संख्येनं शहरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. याशिवाय, या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी यांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलास रवाना केले. अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शोरुमचे व्यवस्थापक शेख ईशान शेख यांनी पोलिसांना कळवल्यानंतर हेड कॉन्स्टेबल वाल्मिक राऊत यांनी घटनेची नोंद केली आहे.