कोरोनाआधी देशात पाच प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे लाखो जणांचा मृत्यू

नवी दिल्ली,२२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-कोरोनामुळे भारतासह जगभरात लाखो जणांचा मृत्यू झाला. मात्र, कोरोनाचा संसर्ग पसरण्यापूर्वी २०१९ मध्ये भारतात पाच प्रकारच्या जिवाणूंमुळे (Bacteria) सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

एका नियतकालिकात याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला आहे. ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जीवाणू भारतीयांसाठी प्राणघातक ठरत आहेत. या जिवाणूंचा संसर्ग २०१९ मध्ये मृत्यूचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे कारण होते.

संशोधकांनी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१९’ व अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्समधील डेटाचा वापर केला. त्यात ३४ कोटी व्यक्तींची जिवाणू संसर्गाबद्दलची माहिती अभ्यासली. जगात ३३ जिवाणूंमुळे २०१९ मध्ये तब्बल ७७ लाख जणांनी प्राण गमावले. यापैकी पाच जिवाणूंमुळेच निम्मे मृत्यू झाले, असेही या अहवालात म्हटले आहे. या ३३ जीवाणूंसह ११ प्रमुख संसर्गांसह त्यांच्याशी संबंधित मृत्यूची प्रथमच माहिती देण्यात आली आहे.

भारतात ई. कोली, एस. न्यूमोनिया, के. न्यूमोनिया, एस. ऑरियस आणि ए. बाउमनी हे पाच जीवाणू सर्वात प्राणघातक ठरत आहेत. २०१९ मध्ये या पाच जीवाणूंमुळे देशभरात सहा लाख ७८ हजार ८४६ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ई कोली सर्वाधिक प्राणघातक जीवाणू असून त्याच्या संसर्गामुळे १.५७ लाख जणांनी प्राण गमावले.

जगभरात २०१९ मध्ये एकूण मृत्यूमध्ये हृदयविकाराचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर जीवाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दुसरा क्रमांक लागतो. जीवाणू संसर्गाचे मृत्यू कमी करण्यासाठी नियंत्रण उपायांची अंमलबजावणी करणे, प्रतिजैवकांचा परिणामकारक वापर महत्त्वाचा असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. जीवाणू संसर्गाला जागतिक सार्वजनिक आरोग्यात महत्त्व देण्याची गरज व्यक्त करत निदान प्रयोगशाळांची संख्या वाढवून मजबूत आरोग्य यंत्रणा उभारण्याचे उपायही सुचविले आहेत.