गोवरची लक्षणे आढळताच आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा- डॉ.विकास मीना

औरंगाबाद, 23 नोव्हेंबर / प्रतिनिधी :- गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसनातून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता रुग्णांनी व पालकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना यांनी केले आहे.

            उपाय-गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.

            वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्या गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने या वयोगटात देण्यात येतो. गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरीत आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

        गोवर लक्षणे ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, ही लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसल्यास सुरुवात होते. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असु शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण कमी होते. अ जीवनसत्व कमी झाल्याने रुग्णाला डोळयांचे आजार, अतिसार, न्युमोनिया, मेंदुज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

            गोवर व इतर आजारांवर शास्त्रीय माहितीसाठी IEC Bureau पुणेच्या Instgram, Twitter, Facbook पेजवर माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी याचा वापर करावा असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.