पालिका निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये?; प्रभाग रचनेच्या कामास सुरूवात करण्याचे आयुक्तांना आदेश

मुंबई ,२२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचा आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी  राज्यातील सर्व महानरपालिका आयुक्तांना दिला. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये पालिका निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकांमधील प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य शासनाने स्वत:कडे घेतले होते. मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कायदा करण्यात आला होता. प्रभाग रचनेचे निवडणूक आयोगाचे अधिकार काढून ते स्वत:कडे घेणाऱ्या राज्याच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असले तरी न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित करण्यात आलेली प्रभागांची संख्या आणि रचनेत बदल करण्याचा निर्णय सत्ताबदल होताच शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. प्रभागांची संख्या कमी करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असले तरी स्थगिती आदेश देण्यात आलेला नाही. म्हणूनच राज्य शासनाने स्वत:कडे असलेल्या अधिकारांचा वापर करीत नव्याने प्रभागांची संख्या आणि रचना करण्याचा आदेश सर्व महापालिकांना दिला आहे.

राज्यातील २८ पैकी २४ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. मुदत संपलेल्या किंवा नजीकच्या काळात मुदत संपणाऱ्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करावे, असा आदेश नगरविकास विभागाने सर्व महापालिकांना दिला आहे. मुंबईतील प्रभागांची संख्या २३६ करण्यात आली होती. शिंदे सरकारने प्रचलित अशी २२७ प्रभागांची संख्या करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शासनाने प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेतले असले तरी प्रारुप राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच अंतिम केले जातील, अशी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. 

निवडणुका कधी ?

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, पिंपरी-चिंचवड, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर आदी महापालिकांची मुदत याप्रू्वीच संपली असून, तिथे प्रशासकीय राजवट लागू आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता निकालात निघाला आहे. प्रभागांच्या रचनेचा मुद्दा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यास फेब्रुवारी वा मार्चमध्ये निवडणुका होऊ शकतात, अशी चर्चा आहे.