वैजापूर – गंगापूर तालुक्याला पिण्यासाठी नांदूर- मधमेश्वर प्रकल्पांतर्गत असलेल्या चार धरणांतील 100 दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित

वैजापूर, २२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- नांदूर मधमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नाशिक जिल्हयातील भाम, भावली, वाकी व मुकणे या चार धरणांतील 100 दशलक्ष घनफुट पाणीसाठा वैजापूर-गंगापूर तालुक्याला पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.या निर्णयामुळे कालवा लाभक्षेत्रातील 45 ग्रामपंचायतींना पाणी टंचाई काळात दिलासा मिळणार आहे. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशी माहिती नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश वनगुजरे यांनी दिली. 

नांदूर मधमेश्वर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नाशिक जिल्हयातील भाम, भावली, वाकी व मुकणे या चार धरणांची एकूण 10.71 टीएमसी पाणी साठवण क्षमता असून त्यातून लाभक्षेत्रातील वैजापूर, गंगापूर व कोपरगाव या तीन तालुक्यांना 2002 पासून सिंचनासाठी पाणी दिले जाते. प्रकल्पाच्या जलसाठ्यात वैजापूर- गंगापूरसाठी स्वतंत्र पिण्याच्या पाण्याचे आरक्षण नसल्यामुळे लाभक्षेत्रातील गावांना टंचाई काळात कालव्यातून बिगर सिंचनाचे पाणी घेण्यासाठी तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या चार धरणातील पाणीसाठ्यात आरक्षण मंजूर करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागातर्फे सादर करण्यात आला होता. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान  भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन 11 टीएमसी पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता उपस्थित होते.

बिगर पाणी सिंचन नियोजनात पिण्यासाठी 15 टक्के, औद्योगिक वापरासाठी 10 टक्के आणि सिंचनासाठी 75 टक्के अशा पध्दतीने वार्षिक पाणी वापर नियोजन करण्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत.त्यानुसार वैजापूर- गंगापूर तालुक्यासाठी 100 दशलक्ष घनफुट पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. अशी माहिती नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता वनगुजरे यांनी दिली.