आता १२ वी नंतर डिग्रीसाठी लागणार ४ वर्षे

नवी दिल्ली,२२ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-भारतातील शिक्षण क्षेत्रातुन एक महत्त्वाची बातमी आली आहे. देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये १२ वी नंतरच्या पदवीसाठी चार वर्षे लागणार आहेत. विश्वविद्यालय अनुदान आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व विद्यापीठांना या संदर्भातील अधिक माहिती ही पुढच्या आठवड्यात पाठवली जाणार आहे. ४५ केंद्रीय विद्यापीठांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

पुढील शैक्षणिक वर्षापासून बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी जे विद्यार्थी प्रवेश घेतली त्यांना पदवी मिळविण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. युजीसीने यासाठी चार वर्षांचा ग्रॅज्युएशन प्रोग्रॅमचा फ्रेमवर्क निश्चित केले आहे. केंद्रीय विश्वविद्यालयासह राज्य स्तरावरील आणि खासगी विश्वविद्यालये देखील चार वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स लागू करणार आहेत. विद्यार्थ्यांकडे तीन वर्षांत डिग्री मिळविण्याचा पर्यायही खुला असणार आहे. हा पर्याय या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांच्यासाठी असणार आहे. तसेच हे विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षात चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी देखील अपग्रेड करू शकतात.

तसेच जे विद्यार्थी आता पहिल्या, दुसऱ्या वर्षाला आहेत, ते देखील FYUGP चा पर्याय निवडू शकतात. चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठे त्यांच्या स्तरावर काही नियमही बनवू शकणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन प्रोग्रॅम पूर्ण केला आहे, त्यांना पीजी किंवा एमफिलसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास ५५ टक्के गुण असणे गरजेचे असणार आहे.