ग्रंथोत्सवातील परिसंवादातून हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा इतिहास संशोधकांचा सहभाग

लातूर, २२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये (टाऊन हॉल) आयोजित ग्रंथोत्सवातील परिसंवादात आज हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाला उजाळा मिळाला. या परिसंवादात इतिहास संशोधक, वक्त्यांनी ऐतिहासिक घटनांची मांडणी केली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक जयप्रकाश दगडे होते.

प्रा. भूषणकुमार जोरगुलवार, प्रा. डॉ. सदाशिव दंदे, प्रा. डॉ. सतीश यादव, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सहशिक्षक भाऊसाहेब उमाटे यांनी परिसंवादात आपले विचार मांडले.

निजाम हा स्वतंत्र हैदराबाद राष्ट्र उभारणीच्या तयारीला लागला होता. साधारणपणे १९२० च्या दरम्यान, गांधीजींचा संस्थानिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण सुरुवातीला सहानुभूतीचा होता. परंतु, १९३५ च्या कालखंडात निजामासारख्या संस्थानिकांचे वर्तन पाहून गांधीजींचे मत बदलले आणि वरकरणी निजामाविरुध्द जनसामान्य असा वाटणारा लढा पडद्याआड ही लढाई गांधी-नेहरु-सरदार पटेल विरुध्द सातवा निजाम उस्मान अली अशी झाली. निजाम वास्तवामध्ये अत्यंत धूर्त आणि बेरकी होता, त्याला भारतातील हैदराबाद मराठवाड्यासह २४ जिल्ह्याचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे होते,दुर्दैवाने हैदराबाद संस्थानातील काही जहागीरदार व जमिनदारांनी निजामाचे संस्थान राहू द्यावे, अशा १० हजार तारा प्रधानमंत्री पंडित नेहरुंना केल्या होत्या. हा आजवर अंधारात राहिलेला हैदराबाद मुक्तीसंग्रमाचा इतिहास दुर्दैवाने लोकांसमोर अजूनही आलेला नाही, असे ठाम मत प्रा.भूषणकुमार जोरगुलवार यांनी मांडले.

हैदराबाद मुक्तीसंग्रामात आर्य समाजाचे योगदान महत्वपूर्ण होते आणि आर्य समाजाने या संस्थानातील जनतेला मुक्तीचा श्‍वास घेण्याची प्रेरणा दिली. निजामविरुध्द सामान्य जनता असा हा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वाधिक उग्र आणि आक्रमक लढा होता, असे इतिहासाचे अभ्यासक भाऊसाहेब उमाटे म्हणाले. तसेच हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणजे हिंदु-मुस्लिम लढा नव्हे, या लढ्यात अनेक मुस्लिमांनीही योगदान दिले, असे सांगून यासंदर्भात त्यांनी हिप्परग्याच्या राष्ट्रीय शाळेचा उल्लेख केला.

जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाची पार्श्‍वभूमी, नेमकी निजामशाही कोणत्या कारणांनी इथे प्रस्थापित झाली हे सांगितले आणि लातूर जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा स्पष्ट केली. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास सांगून प्राचीन काळापासूनचे लातूरचे असलेले महत्व विषद केले.

सामान्य माणसांच्या मुक्तीसाठी लढलेला लढा, अशा शब्दात हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा उल्लेख करुन विचारवंत प्रा.डॉ. सतीश यादव म्हणाले, हा मुक्तीसंग्राम म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रतिकृती होय. या धर्मनिरपेक्ष लढ्याच्या केंद्रस्थानी शिक्षण होते, आणि शिक्षणाची ही उर्जा मराठवाड्यातील लोकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी निर्माण केली. त्यातूनच १९५० मध्ये औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय आणि नांदेडला पिपल्स कॉलेज उभे राहिले.

लातूरची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी विषद करुन इतिहासाचे अभ्यासक प्रा.डॉ. सदाशिव दंदे यांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या विविध अंगांचा आढावा घेतला. निजाम आणि रझाकार ही नावेच अत्यंत फसवी आहेत, असे ते म्हणाले. निजाम म्हणजे सेवकप्रधान आणि रझाकार म्हणजे स्वयंसेवक असे खरे अर्थ आहेत. परंतु निजाम सेवकांसारखा वागला नाही आणि रझाकाराचे वर्तनही स्वयंसेवकांसारखे नव्हते. या दोन्ही शक्तींचे स्वरुप अतिशय जुलमी, धर्मांध आणि कपटी होते, असे डॉ. दंदे यांनी सांगितले.

नव्या पिढीला हैदराबाद मुक्तीसंग्राम नव्या संदर्भांसह सांगावा लागेल. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे आदिंनी या लढ्याला वैचारिक पाठबळ दिले. खेड्यापाड्यातील बहुजनांनी हा लढा आक्रमक स्वरुपात उंचीवर नेला, दुर्दैवाने या बहुजनांची कामगिरी आणि नावेही अज्ञातच राहिली. हा धगधगता, दाहक इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोंचण्यासाठी या लढ्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि परिसंवादाचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी डॉ. व्यंकट कोलपुके लिखित ‘संघर्ष’ या नाट्यग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या सत्राचे सूत्रसंचालन पत्रकार बाळ होळीकर यांनी केले, हरिश्‍चंद्र डेंगळे यांनी आभार मानले.