चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नेसत नाहीत? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

मुंबई ,२१ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- संभाजी भिडे यांच्या टिकली वादानंतर आता पुन्हा एक वाद उभा समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एका कार्यक्रमात, ‘चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात?’ असा प्रश्न उपस्थित केला आणि साडीवाद सुरु झाला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका करताना म्हंटले की, ” ‘टिकली’वर टीका करणारे, आता ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का?” अशा खोचक शब्दात टीका केली.

एका कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हंटले होते की, “चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत. त्या शर्ट आणि ट्राऊजर का घालतात? मराठी भाषा बोलत असताना मराठी संस्कृतीला शोभणारे कपडे का घालत नाही? आपण सगळ्या गोष्टींचे पाश्चिमात्यीकरण करत आहोत. काय घालायचे हा त्यांचा प्रश्न आहे. पण मग फक्त दिवाळी असली की सगळे तयार होऊन येतात. आत्मनिर्भर भारत म्हणत असताना चॅनेलवर आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही?,” असा सवाल उपस्थित केला. यावर चित्रा वाघ यांनी ट्विट करत, ” ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या!” असे म्हणत टीका केली आहे.

साडीवादावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

टिकली वादानंतर साडीवादाची सुरुवात झाली. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले की, आधी माझे भाषण नीट ऐका. टे ३५ मिनिटांचे भाषण आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, “माझे भाषण नीट ऐका, एकूण ३५ मिनिटांचे भाषण होते. माझी विनंती आहे की, पूर्ण ऐकावे. माझा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांना माझ्यावर टीका करण्याचा पूर्व अधिकार आहे आणि तो ते उत्तमपणे बजावत आहेत. ते आमचे काही कौतुक करणार नाही. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहे. आज तंत्रज्ञान आधुनिक झाले आहेत, पण त्याचा गैरवापरही होत आहे. जर ३५ मिनिटांचे भाषण हे १७ सेकंदाचे सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.