मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवप्रतापदिनी पारंपरिक व ऐतिहासिक वातावरणात फडकणार जरीकाठी भगवा – शंभूराज देसाई

सातारा, २१ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-यंदा 30 नोव्हेंबर रोजी किल्ले प्रतापगड येथे साजरा होणारा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे.  यंदाच्या शिवप्रतापदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते किल्ले प्रतापगडावर भव्य असा जरीकाठी भगवा झेंडा फडकविण्यात येणार आहे.  यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी अचूक करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला,  स्वराज्य विस्ताराचा पाया ज्या गडाच्या पायथ्याशी घातला, इतिहासातील सर्वात मोठा प्रताप घडविला त्या किल्ले प्रतापगडावर अफजलखान वधाची तिथी दरवर्षी शिवप्रतापदिन म्हणून साजरी केली जाते.  शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिवप्रताप दिनासाठीच्या तयारीचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ध्वजस्तंभास शोभेल असा भव्य जरीकाठी भगवा झेंडा ठेवावा. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्यूत रोषणाई करावी, लेझर शो, मशाल महोत्सव व आतिषबाजीचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्युत जनित्र ठेवावे.  तालुकास्तरीय आधिकाऱ्यांनी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे, जास्तीत जास्त नागरिक या उत्सवात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे त्वरीत करावीत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपरिक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या  उपाययोजनांना प्राधान्य द्यावे.  सर्व विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

सुरवातीस सकाळी भवानी मातेची पूजा अभिषेक व आरती त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम.  शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपूतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.   यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप असणार आहे.

Tags: शिवप्रतापदिन