आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) गोव्यात शानदार सोहळ्याने सुरुवात

भारताला चित्रीकरण आणि चित्रपटनिर्मितीनंतरच्या प्रक्रियेचं सर्वात पसंतीचे केंद्र बनवणार: अनुराग ठाकूर

भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय व्यक्तिमत्व-2022 पुरस्कार:नामवंत अभिनेते चिरंजीवी यांना जाहीर

गोवा,२० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- जगभरातील सर्वोत्तम, दर्जेदार चित्रपट आणि अशा चित्रपटांची निर्मिती करणारे सृजनशील कलावंत यांची मांदियाळी पुन्हा एकदा जमवत, 53 व्या इफ्फी म्हणजे, आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाची आज म्हणजेच 20 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यात, पणजी इथल्या, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियम मध्ये शानदार सुरुवात झाली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि गोव्याच्या एन्टरटेरमेंट सोसायटीने संयुक्तरित्या या महोत्सवाचे आयोजन केले आहे. ह्या लोकप्रिय महोत्सवात, यंदा जगभरातील, 79 देशातील 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत.

नऊ दिवस चालणार्या  चित्रपट महोत्सवाची केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दीपप्रज्वलन करत या महोत्सवाची सुरुवात केली. भारताला, चित्रीकरण आणि चित्रपट निर्मितीनंतरच्या प्रक्रियांचे जगभरातले सर्वात पसंतीचे केंद्र बनवण्याचा आपला प्रयत्न आहे, असं सांगत, त्यासाठी, भारतातील कलाकारांची गुणवत्ता आणि या उद्योगक्षेत्रातील धुरीणाचे अभिनव कौशल्य उपयुक्त ठरेल, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. “इफ्फी हा केवळ काही दिवसांचा महोत्सव म्हणून मर्यादित राहू नये, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यावेळी आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करु, या अमृतमहोत्सपासून सुरु झालेल्या अमृत काळाच्या 25 वर्षांत इफ्फी सुरु राहावा, अशी आमची दृष्टी आहे. भारताला सिनेमा आशयनिर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्यासाठी, विशेषतः देशातील प्रादेशिक सिनेमातील आशय निर्मिती अधिक संपन्न करण्यासाठी, प्रादेशिक महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.” असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

भारतातील, विविधरंगी संस्कृतींचा आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलाकृतींचा एकजिनसी संगम होण्यासाठी 53 वे इफ्फी सज्ज झाले आहे, असे अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. “भारतीय सिनेमात भारताच्या समृद्ध संस्कृतींचे, परंपरा, वारसा, आशा-आकांक्षा आणि स्वप्ने, महत्वाकांक्षा तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रत्येक काळात जागी असणारी जनतेची सदसद्विवेकबुद्धी अशा सर्वांचे केवळ प्रतिबिंब असते असे नाही, तर, त्याला नवे पैलू पाडून त्यांचं अत्यंत देखणे रूप  सिनेमातून मांडले जाते.” असे ठाकूर पुढे म्हणाले.

आशियातील या सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवाच्या जुन्या स्मृतींना उजाळा, देत अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, या महोत्सवाच्या सुरुवातीपासून म्हणजे,1952 पासून आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामागची दृष्टी आणि मूल्ये, “वसुधैव कुटुंबकम” या संकल्पनेशी घट्ट जुळलेली आहेत. ही संकल्पना, संपूर्ण जगाला एक कुटुंब मानून, शांततामय सहजीवनाचे तत्व मांडणारी आहे. “जागतिक मंचावर भारताचा वाढता प्रभाव आणि जी-20 चं भारताला मिळालेले अध्यक्षपद, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, ‘एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” याच संकल्पनेमागचा संकल्प अधिक दृढ करणारे आहे.

इफ्फीमध्ये, भारतीय पॅनोरामा, वर्ल्ड ऑफ सिनेमा, आदरांजली, आणि रेट्रोस्पेकटीव्ह असे पारंपरिक विभाग यंदाही असणार आहेत, त्याशिवाय 53 व्या इफ्फीमध्ये, अनेक सुप्रसिद्ध भारतीय चित्रपटांचे, परदेशी चित्रपटाचे, ओटीटी सिरिजचे, भव्य प्रीमियर शो होणार आहेत. त्यावेळी, सिनेसृष्टितील, दिग्गजही उपस्थित राहणार आहेत. इस्राइलचे प्रसिद्ध कलाकार यावेळी उपस्थित राहतील. एनएफडीसीच्या पव्हेलियनमध्ये फिल्म बाजार, केंद्रीय संपर्क ब्युरोचे  मल्टीमिडिया  प्रदर्शन, आणि “उद्याचे 75 सृजनशील कलावंत” साठीचे 53-तास आव्हान, अशा अनेक उपक्रमांचा या महोत्सवात समावेश असेल, असे ठाकूर यांनी सांगितले.

फ्रान्सची ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून निवड म्हणजे भारताकडून फ्रान्ससोबतच्या दृढ संबंधांचा सन्मान

यंदाच्या इफ्फी महोत्सवात ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून फ्रान्सच्या निवडीबद्दल बोलताना मंत्री महोदय म्हणाले की, फ्रान्सचा दूतावास आणि भारतातील इन्स्टिट्यूट फ्रँन्साईस यांच्या संयुक्त विद्यमान समकालीन चित्रपटांचा संग्रह प्रदर्शित करून भारत एका अर्थानं फ्रान्ससोबतच्या दृढ संबंधांचा सन्मान करत आहे. “फ्रेंच सिनेमातील आशयघन कथानकं आणि त्यातल्या कलाकारांच्या सकस अभिनयामुळे, फ्रेंच चित्रपटाांनी जागतिक पातळीवर सिनेमाची नवी परिभाषा रचली आहे, त्यासोबतच जगभरातील कालातीत सिने सौंदर्यशास्त्राची व्याख्याही रचली आहे. 

भारत आणि फ्रान्समधले दीर्घकालीन मैत्रीचे संबंध, धोरणात्मक सहकार्य तसेच संरक्षण क्षेत्रासह, दहशतवादविरोधी लढा, अणुऊर्जा, अंतराळ आणि चित्रपट क्षेत्रातील वाढत्या सहकार्याचा आणि परस्पर देवाणघेवाणीचा मला अभिमान वाटतो असं ते म्हणाले. 75 व्या कान चित्रपट महोत्सवात, मार्च डी फिल्म्सअंतर्गत भारताचा ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणन  गौरव केला गेला होता. तीच भावना कायम ठेवत इफ्फीच्या या 53 व्या आवृत्तीत फ्रान्सचे ‘कंट्री ऑफ फोकस’ म्हणून स्वागत करताना आपल्याला अत्यंत आनंद होत आहे.” असं ठाकूर यांनी सांगितले.

उद्याच्या सर्जशील व्यक्तीमत्वांच्या ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ संख्येत दरवर्षी वाढ करणार

’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाचा भविष्यातील आराखडा कसा असेल याविषयीदेखील  त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य मिळून जितकी वर्षे झाली ती संख्या दर्शवता यावी यासाठी दरवर्षी अशा सर्जशील व्यक्तिमत्वांची संख्या एकाने वाढवली जाईल. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उदयाला आल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं, देशातील कल्पक  आणि सर्जनशील तरुणांची स्वप्न आणि महत्त्वाकांक्षेला उभारी देण्यासाठी ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला होता.

यंदा, दिग्दर्शन, संपादन, पार्श्वगायन, पटकथा लेखन, अॅनिमेशन आणि अभिनय अशा १० श्रेणींमध्ये सुमारे १००० अर्ज आले होते. त्यांनंतर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, राष्टेरीय चित्रपट पुरस्कार विजेत, ग्रॅमी आणि ऑस्कर पुरसकार विजेत्यांचा समावेश असलेल्या निवड समितीनं, अत्यंत कठोर परीक्षण करून ’75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ ची निवड केली असं त्यांनी सांगितलं.

अल्मा आणि ऑस्कर या उत्कृष्ट ऑस्ट्रियन चित्रपटांने झाली  53 व्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात

53 व्या इफ्फीची सुरुवात ऑस्ट्रियन लेखक दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या अल्मा आणि ऑस्कर या उत्कृष्ट चित्रपटाने झाली . व्हिएन्नामधील वयस्क  अल्मा मह्लेर आणि ग्रामीण अॉस्ट्रियातील कलाकार ऑस्कर कोकोश्का यांच्यातील उत्कट तरीही गोंधळलेल्या नातेसंबंधांचे अत्यंत उत्कृष्ट चित्रण या चित्रपटात केले आहे.   

यावर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल स्पेनचे सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते कार्लोस सौरा यांचे केंद्रीय मंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. “सौरा गेल्या सहा दशकांहून अधिक काळ चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असून आता वयाच्या नव्वदीतदेखील ते त्यांचा कॅमेरा घेऊन  कार्यरत आहेत.त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांनी खूप मोठ्या संख्येने पुरस्कार तसेच नामांकने मिळवली आहेत. यंदाच्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहोळ्यामध्ये ख्यातनाम चित्रपट निर्माते सौरा यांच्या वतीने त्यांची कन्या अॅना सौरा हा पुरस्कार स्वीकारला  आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे,” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले.

अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडे

2022 चा इफ्फी इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार मेगास्टार आणि अभिनेता-निर्माता चिरंजीवी कोनिडेला यांना देण्यात येत असल्याची  घोषणा ठाकूर यांनी केली.

इफ्फीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘चित्रपट बाजार’ या उपक्रमाचे महत्त्व देखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विशद केले. “चित्रपट बाजार हा जागतिक चित्रपट निर्मिती उद्योग आणि आपली सर्जनशील अर्थव्यवस्था यांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे. याचाच अर्थ असा की, हा बाजार म्हणजे दक्षिण आशियाई चित्रपट साहित्याचा शोध, मदत आणि सादरीकरण तसेच चित्रपट निर्मिती, उत्पादन आणि वितरण या क्षेत्रांतील प्रतिभा यांवर लक्ष केंद्रित केलेल्या संपूर्ण जगभरातील चित्रपट विक्रेते आणि खरेदीदार यांच्या एकत्र येण्याचे  हे ठिकाण आहे.हा महोत्सव चित्रपट निर्मात्यांना त्यांनी तयार केलेले चित्रपट जगासमोर सादर करण्यासाठी आणि त्यांच्या चित्रपटात चित्रित केलेल्या विषयांबद्दल सखोलपणे चर्चा करण्यासाठी एक अनोखा मंच पुरवतो.” ते म्हणाले. “इफ्फीने यावर्षी प्रथमच देशांच्या दालनांची सुरुवात करून चित्रपट बाजाराची व्याप्ती वाढविली आहे. चित्रपट बाजार उपक्रमाच्या या 15 व्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांना यातील 40 दालनांना भेट देण्यासाठी आमंत्रित करतो.तसेच यावर्षी प्रथमच इफ्फीमध्ये चित्रपटांच्या जगातील अत्याधुनिक संशोधनांची माहिती सादर करणारे तंत्रज्ञान केंद्र देखील उभारण्यात येणार आहे,”केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी सांगितले.

सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण इफ्फी

विविधतेला जोपासण्यामधील इफ्फीची भूमिका स्पष्ट करताना अनुराग ठाकूर म्हणाले की चित्रपट निर्मिती, माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी कामगिरी करणाऱ्या जगभरातल्या  असामान्य महिलांना इफ्फी महोत्सव आपल्या व्यासपीठावर मानाचं स्थान देऊन त्यांच्या प्रतिभेचा उत्सव साजरा करतो. “वैयक्तिक अनुभव, वेधक दृष्टीकोन, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरील माहितीपूर्ण दृष्टीकोन यासह महिलांचं या क्षेत्रातलं वाढतं प्रतिनिधित्व पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 53 वा इफ्फी महोत्सव महिला चित्रपट निर्माते, कथाकार, अभिनेते आणि कलाकारांचं काम प्रदर्शित करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे, कारण आपण परंपरा मागे टाकून महिला चित्रपटकर्मींवर लक्ष केंद्रित केलं आहे,” मंत्री म्हणाले.  

महोत्सव अधिक सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी प्रवेश-योग्य बनावा म्हणून, दिव्यांगजनांसाठी चित्रपट प्रदर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, ठाकूर म्हणाले. “त्यांच्या प्रवेश-योग्यतेच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन, या विभागातले चित्रपट संवाद वर्णन आणि उप-शीर्षकांसह ऑडिओ-व्हिज्युअल-सुसज्ज असतील. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया (FTII) दिव्यांगजनांसाठी दोन विशेष अभ्यासक्रम आयोजित करणार असून, यामध्ये  ऑटिस्टिक व्यक्तींसाठी ‘स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ आणि व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी ‘पडद्यावरील अभिनय’ या प्राथमिक अभ्यासक्रमांचा समावेश असेल.” ते म्हणाले.  

इफ्फीमुळे कला आणि चित्रपट जगतातल्या सीमा पुसल्या जात आहेत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचं प्रतिपादन

कोविडच्या संकटानंतर इफ्फीची ही 53 वी आवृत्ती पुन्हा एकदा आपल्या बहुढंगी बहुरंगी उत्सवी अवतारात पुनरागमन करेल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. “इफ्फीमुळे कला आणि चित्रपट जगतातल्या सीमा पुसल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या चित्रपट संस्कृतींना एकमेकांशी जडून घेत, परस्पर सहकार्यातून भागिदारीत काम करण्याच्या नव्या संधीचा शोध घेण्याचा अवकाश मिळत आहे, असंही मुरूगन यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, आपल्या पंतप्रधानांनी इफ्फीचं वर्णन करताना, हा एक असा चित्रपट महोत्सव आहे, ज्यातून सिनेसृष्टीमुळे एकत्र आलेल्या, विविध देश आणि समाजांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना परस्परांमधला समन्वय घडवून आणण्यासाठी चालना देतो प्रोत्साहन देतो. इफ्फीची ही 53 वी आवृत्ती, 75 क्रिएटिव्ह यंग माइंड्स, मास्टरक्लासेस, बॉक्स ऑफिसचे बहुरंग / बॉक्स ऑफिस फ्लेवर्स, फिल्म बाजार आणि जागतिक सिनेमा”, अशा प्रकारच्या सीनेप्रेमींच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या विविध उपक्रमांनी नटलेली असल्याचं त्यांनी सांगितलं.

गोव्यामधील नवीन जागतिक दर्जाचे मल्टिप्लेक्स आणि कन्व्हेन्शन सेंटर लवकरच सुरु होणार

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांना संबोधित करताना, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्यात जागतिक दर्जाचे  मल्टिप्लेक्स आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आणि 2025 मधील इफ्फी आपण नवीन ठिकाणी साजरा करू, अशी आशा आहे.

महोत्सवामध्ये स्थानिक अभिरुचीची जोड देण्याच्या  प्रयत्नांचा उल्लेख करून प्रमोद सावंत म्हणाले की, यंदाच्या इफ्फीमध्ये राज्य सरकारने गोव्यातील चित्रपट कलाकारांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यामध्ये हिंदी आणि मराठी चित्रपट चित्रपट क्षेत्रातील नामवंत कलाकार सहभागी होतील. “या वर्षी गोवन विभाग देखील विशेष तयार करण्यात आला आहे. यासाठी इंडियन पॅनोरमाच्या निवड समितीच्या तीन  सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष निवड समितीने सहा लघुपट आणि एक माहितीपट निवडला आहे. फेस्टिवल माईल, एनटरटेनमेंट झोन आणि हेरिटेज परेड यांसारख्या बहुविविध उपक्रमांद्वारे आम्ही पर्यटकांचे आणि गोव्यातील जनतेचे लक्ष वेधण्यात यशस्वी झालो आहोत”, ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की संपूर्ण गोव्यात कॅराव्हॅन तैनात केले जातील आणि लोकांसाठी स्क्रीनिंग आयोजित केले जाईल. महोत्सव आणखी सर्वसमावेशक व्हावा, यासाठी दिव्यांगजनांसाठी चित्रपटांचे विशेष खेळ देखील आयोजित करण्यात आले आहेत, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रमोद सावंत यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्मरण देखील केले, ज्यांच्या प्रयत्नांमुळे गोवा हे इफ्फी महोत्सवाचे कायम स्वरूपी आयोजन स्थळ बनले.  

महोत्सवाला उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचीव अपूर्व चंद्रा म्हणाले की, इफ्फी हे भारतीय चित्रपट उद्योगासाठी जगासमोर आपले सर्वोत्कृष्ट सादरीकरण प्रदर्शित करण्यासाठी आणि उर्वरित जगातून चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम पद्धतींना आमंत्रित करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. सचिवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक विशेष संदेश देखील वाचून दाखवला. “‘‘भारतातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून, इफ्फी  विविध देश आणि समाजातील प्रतिनिधींमध्ये, सिनेमाच्या माध्यमातून एकत्र येण्याच्या उत्साहवर्धक समन्वयाला प्रोत्साहन देते,’’ असा हा संदेश आहे.   

गोवा सरकारचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंदर भाकर आणि इतर मान्यवरही उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. मृणाल तखूर, वरुण धवन, कॅथरीन तेरेसा, सारा अली खान, कार्तिक आर्यन आणि अमृता खानविलकर यांसारख्या सिने सेलिब्रिटींनीही उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावली.