डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संघर्षही झाले त्यासाठी काही किंमत मलाही द्यावी लागली-शरद पवार

औरंगाबाद, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही औरंगाबाद पुढे येत आहे. नवीन पिढीला आंतरराष्ट्रीय पातळीवर दालने खुले करुन देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. शैक्षणिक क्षेत्रासोबतच मराठवाड्यातील शेतीक्षेत्रही बदलू लागले आहे. मराठवाड्यात वाढू लागलेल्या ऊस शेतीला चालना देण्याचा आपला प्रयत्न आहे. वसंतराव नाईक शुगर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून जालना येथे शेती, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात संधी देणारी संस्था लवकरच सुरू करण्यात येणार आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते  बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमात शरद पवार यांनी केलेले भाषण सविस्तर:   

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने माझा सन्मान करण्यात आला याबद्दल मी अत:करणापासून विद्यापीठाचे आभारी आहे. हे विद्यापीठ महाराष्ट्रातील ऐतिहासिक विद्यापीठ आहे. मला त्याच्या निर्मितीपासूनचा सर्व कालखंड आठवतो. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि या देशाला घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही ज्यांनी मजबूत करण्याची अतिशय महत्वाची कामगिरी केली ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा या विद्यापीठाच्या निर्मितीत संबंध होता. त्याकाळात शैक्षणिक क्षेत्रात फारशी प्रगती नसताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या कामात लक्ष घातले. ते स्वत: औरंगाबादला आले व बिल्डींगचा सर्व कँप्मस उभा करण्याची मोलाची कामगिरी त्यांनी केली. हा शैक्षणिक क्षेत्राचा आणि इतिहासाचा एक महत्वाचा भाग आहे.

मराठवाडा त्या कालखंडात शिक्षणाच्या क्षेत्रात एका मर्यादेच्या पुढे पोहचले नव्हते. त्यावेळी शैक्षणिक संस्थां म्हणून उदगीर, सेलू, अंबाजोगाई हा भाग नजरेपुढे येईल त्याकाळातच औरंगाबाद हे शैक्षणिक क्षेत्रात विस्तारीत करावे ही भूमिका नेतृत्वाने घेतली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचे मोठं दालन मराठवाड्यासाठी उभे केले असे म्हणाले तरी अतिशयोक्ती होणार नाही. औरंगाबाद म्हटलं की, सरस्वती भवन असेल, मराठवाडा शिक्षण संस्था असेल आणि अलीकडच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशाप्रकारची दर्जेदार संस्था एमजीएमच्या माध्यमातून या परिसरात उभी केली व ज्ञानाचे क्षेत्र विस्तारित करण्यासाठी औरंगाबाद, मराठवाडा मागे नाही या प्रकारची स्थिती निर्माण केली.

या विद्यापीठात संघर्षही झाले त्यासाठी काही किंमत मलाही द्यावी लागली. मात्र मला एका गोष्टीचा आनंद आहे की या विभागात आणखी एक विद्यापीठ तयार करण्यासाठी जो निर्णय घ्यावा लागला त्यातसुद्धा माझा सहभाग होता. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात एक विस्तारीत शैक्षणिक दालनं ही उभी राहण्याबद्दलची कामगिरी अशाप्रकारच्या निर्णयाच्या माध्यमातून झाली.

आज मराठवाडा म्हटल्यानंतर शेती आणि येथील सामान्य माणूस याचे संबंध काय हे सांगण्याची आवश्यकता नाही. अलीकडे इथली शेती बदलायला लागली आहे. ऐकेकाळी ज्वारी-बाजरीची शेती, मर्यादित पिकांची शेती हे चित्र आता बदलले जातयं. आज मराठवाडा ऊसाच्या निर्मितीमधील एक महत्वाचा भाग होऊ लागला आहे. इथेही नवीन तंत्रज्ञान कसे आणता येईल याचा विचार आम्ही करतोय. या देशात ऊसाच्या क्षेत्रात संशोधन करणारी आणि ऊसातील अन्य जे घटक आहेत त्याला प्रोत्साहीत करणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. आमचा प्रयत्न आहे की, या संस्थेच्या माध्यमातून या सर्व क्षेत्रात अमूलाग्र बदल कसा होईल याची काळजी आम्ही घेता आहोत. हे करत असताना माझ्यापुढे मराठवाडा प्रकर्षाने येतो.

राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या सहाय्याने मराठवाड्यात एक राष्ट्रीय पातळीची ऊसाच्या क्षेत्रात संशोधन करणारी, नवीन जाती देणारी, कमीत कमी पाण्यावर पीक येणारी, हे करत असताना हा संपूर्ण धंदा वाढत आहे त्याला लागणारे मनुष्यबळ देण्यासाठी एक संस्था काढण्याची आवश्यता आहे. त्यासाठी अलीकडेच आम्ही जालनाजवळ शंभर एकर जमीन खरेदी केली आहे. लवकरात लवकर याठिकाणी संस्थेचे केंद्र सुरु करून शेतीसोबत उद्योगाच्या, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संधी देणारी एक संस्था उभी करू. तसेच मला आनंद आहे नागपूरजवळ अशा प्रकारचे केंद्र उभे करण्यासाठी गडकरींनी जमीन उपलब्ध केली त्याठिकाणीही लवकरच असे केंद्र उभे केले जाईल.

शिक्षणाच्या क्षेत्रात नव्या पिढीला संपूर्ण देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील दालनं खुली करून देण्यासाठी त्याची गुणवत्ता वाढेल कशी याची काळजी घेण्याची आवश्यता आहे. हे सगळं करण्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रस्थानी राहील अशी अपेक्षा केली तर चुकीचे होणार नाही. मी मराठवाडासंबंधी अतीव आस्था असलेला सहकारी म्हणून एवढेच सांगू इच्छितो की, आपण या सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने दोन पावले अधिक कशी टाकता येतील व यश संपादित कसे होईल याची काळजी निश्चितपणे घेवू. या कामाला आम्हासर्वांची साथ ही विद्यापीठाला अखंड राहील हा विश्वास याठिकाणी मी देतो.

आज मला आणि नितीन गडकरींना याठिकाणी निमंत्रित करून जे काम आम्ही करतो त्याची नोंद घेवून आम्हाला सन्मानित केल्याबद्दल विद्यापीठाच्या सर्व सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.