वैजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी महाविकास आघाडीचे मधुकर साळुंके यांची बिनविरोध निवड

वैजापूर, १९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महाविकास आघाडीचे मधुकर दत्तात्रय साळुंके यांची तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे गटाचे कैलास साहेबराव साळुंके यांची शुक्रवारी (ता.18) बिनविरोध निवड झाली.सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध होऊन संचालक मंडळाच्या 13 जागांपैकी 8 जागांवर महाविकास आघाडीचे तर 5 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.

सर्वसाधारण मतदार संघातून कैलास साहेबराव साळुंके, मधुकर दत्तात्रय साळुंके, जगन्नाथ इंगळे, हिरामण रंगनाथ शेळके,अरविंद रंगनाथ साळुंके,संतोष नानासाहेब मापारी, रतिलाल गंगाधर गायकवाड व भिका सावळेराम नाईकवाडी, अनुसूचित जाती- जमाती मतदारसंघातून प्रशांत उत्तमराव त्रिभुवन, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून शांतीलाल नामदेव पवार, भटक्या विमुक्त जाती- जमाती मतदारसंघातून गोरख उत्तमराव गावडे तर महिला राखीव मतदारसंघातून अनिता देविदास वाणी व शोभा कैलास नांगरे हे बिनविरोध निवडून आले होते. 

सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची आज निवड होती. संचालक मंडळाप्रमाणेच चेअरमन व व्हाईस चेअरमनची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मा. नगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, देविदास पाटील वाणी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी आदींनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन चेअरमनपदी महाविकास आघाडीचे मधुकर दत्तात्रय साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे गटाचे कैलास साहेबराव साळुंके निवड करण्यात आली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे सर्व 5 संचालक व्हाईस चेअरमनपदासाठी इच्छुक होते. चिठ्ठी काढून कैलास साहेबराव साळुंके यांची निवड झाली.