राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआ फुटण्याच्या उंबरठ्यावर-खासदार संजय राऊत

मुंबई : राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, अशी शक्यता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विधानांची जोरदार चर्चा चालू आहे. हिंगोलीतील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून भाजपाने काँग्रेस आणि त्यांच्यासह शिवसेनेवरही परखडपणे टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असणाऱ्या शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न भाजपाकडून उपस्थित केला जात होता. यावर उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता संजय राऊतांनी याबाबत मोठं विधान केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटण्याच्या उंबरठ्यावर आली आहे की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

“राहुल गांधींनी मध्येच वीर सावरकरांचा मुद्दा आणण्याची गरज नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते. मी तुम्हाला सांगून ठेवतोय. कारण वीर सावरकर हे नेहमीच आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत आणि नेहमी राहतील”, असे संजय राऊत म्हणाले.”काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितले आहे की, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, चुकीचे वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही. शिवसेना ते सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो”, असेही ते म्हणाले.

“राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातलं वातावरण हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं झालं आहे. महागाई, बेरोजगारी अशा विषयावर त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. असं असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचं काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला नसून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या वर्गाला वीर सावरकरांबद्दल आदर आहे. इतिहास काळात काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिडवत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं”, अशा शब्दांत संजय राऊतांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे.

काय आहे नेमका वाद ?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद गुरुवारी राज्यात उमटले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेले पत्र राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करत, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे सांगताना, स्वातंत्र्यलढ्यात तुमच्यातील कोण होते, असा प्रतिसवाल भाजपला विचारला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वाद येत्या काळात चांगलाच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाशीम येथे क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, ‘एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली.’ राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून भाजपने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींना अटक करा! रणजित सावरकरांचे पोलिसांना पत्र

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दादरमधील शिवाजी पार्क पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली असून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना त्वरित अटक करुन त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.