औरंगाबादेत पुढील दोन वर्षांत किमान ३५०० कोटींची गुंतवणूक

औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रात आगामी काळात मोठी गुंतवणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-उद्योगांना आवश्यक असणारे उद्योगस्नेही वातावरण देण्याचे काम राज्य सरकार करत असून येत्या काळात औरंगाबाद आणि राज्याच्या विविध भागात मोठी गुंतवणूक करण्यासाठी उद्योजक पुढे येत आहेत. त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासन करेल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादनात अग्रेसर एथर कंपनीसह चार कंपन्या येथील डीएमआयसीत उत्पादन करण्यास अनुकूल आहेत. या माध्यमातून पुढील दोन वर्षांत औरंगाबादेत किमान ३५०० कोटींची गुंतवणूक होईल. यातून १५ हजार प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची आशा आहे. 

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी औरंगाबाद परिसरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या तसेच उद्योग विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसोबत चर्चा केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ऑरिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्यासह उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासन राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करेल आणि ज्या ज्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या उपलब्ध केल्या जाईल. ज्या उद्योजकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यावर येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योजकांच्या पसंतीचे राज्य आहे. त्यामुळे राज्यात उद्योगासाठी आवश्यक सुलभ वातावरण देणे, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या शक्य तितक्या कमी वेळात देणे या बाबींना आमचे प्राधान्य आहे. उद्योग समूहांकडून नव्याने प्रस्ताव आल्यास त्यावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कंपन्यांत सुमारे १५ हजार नवे रोजगार निर्माण होण्याची आशा

१. एथर एनर्जी : इलेक्ट्रिक दुचाकीच्या या कंपनीला बिडकीनमध्ये १०० एकर जागा हवी आहे. ही कंपनी ८५० कोटींची गुंतवणूक करणार असून किमान साडेतीन हजार रोजगार मिळतील. सध्या इथे बजाज ‘चेतक’ ईव्हीची निर्मिती होते.

२. एंड्रेस+हाउजर : ही कंपनी चीनमधील प्रकल्प भारतात अाणणार आहे. यापूर्वी वाळूजमध्ये त्यांचा प्रकल्प आहे. मागील काही वर्षांत या प्लँटची गुंतवणूकदेखील वाढवली आहे. ऑरिकमध्ये ही कंपनी १५०० कोटींची गुंतवणूक करू इच्छिते.

३. पिरामल फार्मा, कॉस्मो फिल्म्स : या दोन्ही कंपन्या बिडकीन डीएमआयसीत प्रत्येक एक – एक हजार कोटीची गुंतवणूक करणार आहेत. या दोन्ही कंपन्या अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट उभारणार आहेत.

यावेळी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष नितीन गुप्ता, मानद सचिव अर्पित सावे, उद्योग प्रतिनिधी अथर्वेश नंदावत, एथर एनर्जीचे संचालक मुरली शशिधरन, पिरामल फार्मा सोल्युशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मयंक मट्टू, कॉस्मो फर्स्टचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक जयपूरिया आदी उपस्थित होते.