जी-२०चे अध्यक्षपद भारताकडे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट-पंतप्रधान मोदी

बाली : इंडोनेशियाची राजधानी बाली येथे झालेल्या दोन दिवसांच्या जी-२० (G-20) शिखर परिषदेची आज सांगता झाली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. म्हणजेच आता पुढील जी-२० शिखर परिषद भारतात होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेला संबोधित केले.

शिखर परिषदेच्या समारोप समारंभात इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले. १ डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारेल.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘जगाला भौगोलिक-राजकीय तणाव, आर्थिक मंदी यांचा सामना करावा लागत असताना भारत जी-२० ची जबाबदारी घेत आहे. अशा परिस्थितीत जगाला जी-२० कडून मोठ्या अपेक्षा आहेत. जी-२० चे अध्यक्षपद मिळणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.’

इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-२० परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर अनेक जागतिक नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली आणि अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. यादरम्यान इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी पुढील जी-२० परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान दिलेल्या संदेशाची प्रतिध्वनी बुधवारी जी-२० शिखर परिषदेच्या घोषणेने व्यक्त केली. जाहीरनाम्यात, नेत्यांनी “आजचे युग युद्धाचे युग नसावे” असे म्हणत युक्रेन युद्ध त्वरित संपविण्याचे आवाहन केले. शिखर परिषदेच्या शेवटी एक डॉक्यूमेंट जारी करण्यात आले, ज्यामध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे परिणाम यावर व्यापक चर्चा करण्यात आली.

जी-२० ही जागतिक आर्थिक सहकार्याची प्रभावशाली संघटना आहे. हे जागतिक जीडीपीच्या सुमारे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.

जी-२० मध्ये सहभागी देश

जी-२० मध्ये भारत, इंडोनेशिया, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, अमेरिका, आणि युरोपियन युनियन (ईयू) यांचा समावेश आहे.

बाली येथील जी -20 शिखर परिषदेच्या समारोप सत्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

माझे मित्र राष्ट्राध्यक्ष जोकोवी यांचे पुन्हा मी एकदा अभिनंदन करू इच्छितो. या कठीण काळातही त्यांनी जी-20 परिषदेला  सक्षम नेतृत्व दिले आहे. आणि बाली घोषणापत्र स्वीकारल्याबद्दल मी आज जी-20 समुदायाचे अभिनंदन करतो. जी -20 परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत इंडोनेशियाच्या स्तुत्य उपक्रमांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. बाली या पवित्र बेटावर आपण जी-20 अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत आहोत हा भारतासाठी अतिशय शुभ योगायोग आहे. भारत आणि बाली यांचे जुने नाते आहे.

सन्‍माननीय महोदय,

जग एकाच वेळी भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किंमती आणि साथीच्या रोगाचे दीर्घकालीन दुष्परिणाम यांच्याशी झुंजत असताना भारत जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारत आहे. अशा वेळी जग जी -20 कडे आशेने पाहत आहे. आज, मला खात्री द्यायची आहे की भारताचे जी-20 परिषदेचे अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल.

सन्माननीय महोदय,

पुढील एका वर्षात, नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि सामूहिक कृतीला गती देण्यासाठी जी-20 परिषद एक जागतिक मुख्य प्रवर्तक म्हणून काम करेल याची ग्वाही देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नैसर्गिक स्त्रोतांवर मालकीची भावना आज संघर्षाला जन्म देत आहे आणि हेच पर्यावरणाच्या विनाशाचे मुख्य कारण बनले आहे.  पृथ्वी ग्रहाच्या सुरक्षित भविष्यासाठी, विश्वस्तपणाची भावना हा उपाय आहे. ‘लाइफ’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ मोहीम यामध्ये मोठे योगदान देऊ शकते. शाश्वत जीवनशैलीला लोकांची चीचळवळ बनवणे हा त्याचा उद्देश आहे.

सन्माननीय महोदय,

विकासाचे फायदे सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक असण्याची आज गरज आहे. आपण विकासाचे फायदे सर्व मानवांना करुणेच्या भावनेने आणि एकजुटीने पोहोचवायचे आहेत. महिलांच्या सहभागाशिवाय जागतिक विकास शक्य नाही. आम्हाला आमच्या जी-20 कार्यक्रम पत्रिकेतही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य द्यायचे आहे. शांतता आणि सुरक्षिततेशिवाय, आपल्या भावी पिढ्या, आर्थिक विकासाचा  किंवा तांत्रिक नवकल्पनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. जी -20 ला शांतता आणि सौहार्दाच्या बाजूने दृढ संदेश द्यायचा आहे. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य”या भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या संकल्पनेमध्ये हे सर्व प्राधान्यक्रम पूर्णपणे समाविष्ट आहेत.

सन्माननीय महोदय,

जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही आमच्या देशातील विविध शहरे आणि राज्यांमध्ये जी -20 परिषदेच्या बैठका आयोजित करू. आमच्या पाहुण्यांना भारतातील आश्चर्यकारक विविधता, सर्वसमावेशक परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धीचा पूर्ण अनुभव मिळेल. ‘लोकशाहीची मातृभूमी अशी ओळख असलेल्या’ भारतातील या अनोख्या उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. चला आपण एकत्रितपणे, या जी -20 परिषदेला  जागतिक बदलासाठी अधिक प्रेरक बनवूया.