वाहनातून घरामध्‍ये गुटखा- सुगंधीत पानमसल्याचा साठा उतरविताना तिघांना बेड्या

औरंगाबाद,१६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वाहनातून घरामध्‍ये गुटखा- सुगंधीत पानमसल्याचा साठा उतरविताना गुन्‍हे शाखेने छापामारुन तिघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई मंगळवारी दि.१५ रात्री पावणे अकरा वाजेच्‍या सुमारास महुनगर (सातारा परिसर) येथे करण्‍यात आली. आरोपींकडून १९ लाख ८६ हजारांच्‍या गुटख्‍यासह ए‍क चारचाकी वाहन आणि मोबाइल असा सुमारे २४ लाख ९६ हजार ६६० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला.

इरफान रशीद खान (३४, रा. मोहम्मदी चौक, सिल्कमिल कॉलनी, ह.मु. महुनगर, सातारा परिसर), सय्यद सोहेल सय्यद महेमुद (२६, रा. कैसर कॉलनी) आणि मोहम्मद वसीम मोहम्मद हुसैन (३६, रा. आमराई बीड बायपास रोड) अशी आरोपींची नावे असून त्‍यांना १८ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहिद साजीदुज्जूमॉ यांनी बुधवारी दि.१६ दिले.

प्रकरणात गुन्‍हे शाखेचे पोलिस  नाईक मनोज चव्‍हाण यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, १५ नोव्‍हेंबर रोजी एका चारचाकी वाहनातून (क्रं. एमएच-२०-ईजी-४७१७) गुटखा-सुगंधीत पान मसाल्याचा साठा घेवून महुनगर (सातारा परिसर) येथील एका घरात उतरवला जाणार असल्याची माहिती गुन्‍हे शोखेचे सहाय‍क निरीक्षक ज्ञानेश्र्वर अवघड यांना मिळाली. माहिती आधारे अवघड यांच्‍या पथकाने रात्री पावने अकरा वाजेच्‍या सुमारास सापळा रचून वाहनातून गुटखा-सुगंधीत पानमसाल्‍याचा साठा एका घरात उतरवितांना छापा मारुन तिघांना बेड्या ठोकल्या. वाहनातून ७ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा गुटखा-सुंगधीत पानमसाला जप्‍त करण्‍यात आला. अवघड यांनी घराची झडती घेतली असता घरातून सुमारे १२ लाख ४४ हजार १६० रुपयांचा गुटखा-सुगंधीत पानमसाला हस्‍तगत केला. पोलिसांनी १९ लाख ८६ हजारांच्‍या गुटख्‍यासह एक चारचाकी वाहन आणि मोबाइल असा सुमारे २४ लाख ९६ हजार ६०० रुपयांचा ऐवज हस्‍तगत केला. प्रकरणात सातारा पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील आमेर काजी यांनी आरोपींनी इतक्या मोठ्या प्रमाण गुटखा-सुंगधीत पानमसाला कोठुन, कोणाकडून आणला व कोणाला विक्री करणार होते. गुन्‍ह्यात जप्‍त चारचाकी कोणाच्‍या मालकीची आहे. जप्‍त करण्‍यात आलेला गुटखा आरोपी कोठे ठेवणार होते, आरोपींची आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस  कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.