जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबई ​,१५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीतून वाट काढत पुढे जात असताना एका महिलाला बाजूला केले. यानंतर त्या महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये हल्लकल्लोळ माजला. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी अटक टाळण्यासाठी ठाणे कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यावर झालेल्या सुनावणीनुसार कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.रिदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वाय जंक्शन येथे रविवारी रात्री एमएमआरडीएने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले. या लोकार्पण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसून जात असताना रिदा त्यांना भेटण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाजूला हो, असे म्हणत ढकलले, असे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, जामीन मिळाला असला तरी या आरोपांमुळे आपण खुश नसल्याची भावना व्यक्त केली. अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हंटले की, “एका बाईला पुढे करुन महाभारतासारखं राजकारण केले. मला अडकविण्यासाठी हे षडयंत्र होते. पोलिसांवरील दबावामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण मला असे वाटते की, गुन्हा नोंदविण्यापूर्वी व्हिडिओ पहायला हवा होता. अटकपूर्व जामीन मिळाला असला तरीही माझी अस्वस्थता अजूनही शांत झालेला नाही.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.