उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार

राज्यपाल कोश्यारी व उत्तराखंडच्या उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान

मुंबई,१४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील  सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी उत्तराखंडचे उद्योगमंत्री चंदन राम दास, महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व  सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हरिंद्र कुमार गर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तराखंड येथे माहिती तंत्रज्ञान, पर्यटन, नैसर्गिक उत्पादने या क्षेत्रात फार मोठा वाव आहे. धार्मिक पर्यटनाशिवाय उत्तराखंड येथे साहसी पर्यटनासाठी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जातात. महाराष्ट्रातील उद्योजकांनी अधिक यशस्वी व्हावे व उत्तराखंडलादेखील औद्योगिकदृष्ट्या पुढे येण्यास सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.

सामंजस्य करार झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उत्तराखंडचे मंत्री चंदनराम दास म्हणाले की, उत्तराखंड राज्याने उद्योग व्यापारासाठी एक खिडकी योजना लागू केली असून उद्योग वाढीसाठी लँड बँक तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उद्योगांनी उत्तराखंडच्या पहाडी भागात उद्योग सुरु केले तर तेथील लोकांचे स्थलांतर कमी होवून त्यांना रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले.

उत्तराखंड येथे पर्यटन, वेलनेस, प्राकृतिक उत्पादने, औषधी निर्माण, आदरातिथ्य या क्षेत्रात विशेष संधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर लवकरच उत्तराखंड येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरु करेल. तसेच चेंबरतर्फे आयोजित मुंबई येथील व्यापार प्रदर्शनाला उत्तराखंड येथील उद्योगांना निमंत्रित करेल, असे चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

महाराष्ट्र चेंबर ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, करुणाकर शेट्टी, राज अरोरा, शैलेश अजमेरा, चेंबरच्या महिला समितीच्या अध्यक्ष संगीता पाटील, टॉम थॉमस, खुबीलाल राठोड, अविक्षित रमण आदी उपस्थित होते.