सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे पती ऍड.वैजनाथ वाघमारे यांनी आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपले मानून काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

माध्यमांशी बोलताना वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले की, “आम्ही दोघे अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करताना त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे.” पुढे त्यांनी ‘सुषमा अंधारे काही तोफ वगैरे नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्ट्या घडवणारा मीच आहे.’ असा दावादेखील केला.

सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, “माझे पती आणि मी गेली ५-६ वर्षे विभक्त राहतो. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. शिंदेंच्या पक्षात जाणाऱ्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. मी माझ्या पक्षासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे माध्यमांनी ही बातमी फार महत्वाची मानू नये.”