महालगाव येथे किराणा दुकान फोडून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडले

वैजापूर, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे किराणा दुकान फोडून रोख अकरा हजारांची रोख रक्कमेसह गायछाप, आणि सिगारेट साठा असा एकूण तेरा हजारांचा मुद्देमाल घेऊन पळून जाण्याची तयारीत असलेले दोन चोरटे वीरगाव पोलीसांचे गस्ती पथकाचे जाळयात सापडले. किरण रंगा आल्हाट (वय 25), कृष्णा मच्छिंद्र नांगरे (वय 25) दोघेही रा.महालगांव असे पोलीसांनी पकडलेल्या आरोपीचे नावे आहेत.त्यांच्याकडून चोरी केलेली रोख रक्कम आणि साहित्य तसेच चोरी करताना वापरलेली दुचाकी असा एकूण 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महालगाव ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलात किरण हिरडेकर यांचे लाॅन्ड्री व जय बाबाजी किराणा माल विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री दोन वाजेचे दरम्यान गावातील किरण आणि कृष्णा या दोन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून दुकानांचे गल्ल्यात ठेवलेले रोख 11 हजार 340 रुपये तसेच गाय छाप आणि सिगारेट असा एकूण 13 हजार 140 हजारांचा मुद्देमाल घेऊन दोघे जण दुचाकीवरुन जात होते. त्या दरम्यान वीरगाव पोलीस ठाण्याचे पथक वाहनातून परिसरात रात्रीची गस्त घालत होते. पथकातील पोलीस कर्मचा-यांना त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून अधिक विचारपूस केल्यावर त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उतरे दिली. पोलीसांनी त्यांची अंगझडती घेतली असता दुकानातून चोरी केलेला मुद्देमाल आणि रोख रक्कम त्यांच्याकडे आढळून आल्यामुळे त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच महालगांव येथील किराणा दुकान फोडल्याची त्यांनी कबुली दिली.किराणा दुकानदार हिरडेकर यांच्या तक्रारीवरुन दोघा विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन वीरगाव पोलीसांनी दोघांना अटक केली आहे.