वैजापूरजवळ नांदगाव शिवारात ट्रक व कारची समोरासमोर धडक : जखमी झालेल्या डॉक्टरचा उपचार सुरू असताना मृत्यू

वैजापूर, १३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-नाशिक – औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात औरंगाबादमधील एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता.12) सायंकाळी वैजापूर तालुक्यातील नांदगाव शिवारात ही घटना घडली.

अपघातग्रस्त कारमधील जखमी व्यक्ती ही डॉक्टर असून औरंगाबाद येथे दूध डेअरी जवळ त्यांचे स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. त्यांच्या पत्नी बँक ऑफ इंडिया नाशिक शाखेत कार्यरत आहेत. पत्नीला भेटण्यासाठी नाशिकला जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात घडून आला. वैजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करुन त्यांना औरंगाबाद हलवण्यात आले. डॉ. शरद जयराम खेडेकर ( रा. बीड बायपास, औरंगाबाद ) असे अपघातातील जखमीचे नाव आहे. नांदगाव शिवारात ट्रक व कारच्या अपघातात जखमी झालेल्या डॉक्टरचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

डॉ. शरद जयराम खेडेकर

शरद खेडेकर हे शनिवारी पोलो कारमधून क्र. ( एम.एच. 20 एफ.जी.8722 ) नाशिकचे दिशेने जात होते. त्यावेळी नांदगाव शिवारात समोरून येणाऱ्या माल वाहतूक ट्रकशी क्र. ( आर.जे.51 जी.ए. 0284 ) त्यांची समोरासमोर धडक झाली. धडकेमुळे कार रस्त्याच्या बाजूला जावून पडली. यात अडकलेल्या खेडेकर यांना परिसरातील नागरिकांनी धाव घेत बाहेर काढले.दरम्यान अपघातात त्यांच्या वाहनाचा चुराडा झाला होता.