राजीव गांधी हत्येतील सर्व ६ दोषींची सुटका

नवी दिल्ली : राजीव गांधी हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व ६ दोषींना सोडण्याचे आदेश दिले. यामध्ये नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचा समावेश आहे. या आदेशानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे.

१८ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील दोषी पेरारिवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी करण्यात आली होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांनी ३० वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे.

राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी यांना अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तिला गरोदर होऊन दोन महिने झाले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनी यांना माफ केले. नलिनीच्या चुकीची शिक्षा अद्याप जगात न आलेल्या एका निष्पाप मुलाला कशी दिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.

राजीव गांधी हत्येप्रकरणी ट्रायल कोर्टाने कटात सहभागी असलेल्या २६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने १९ जणांची निर्दोष मुक्तता केली. उर्वरित सात आरोपींपैकी चार आरोपींना (नलिनी, मुरुगन ऊर्फ ​​श्रीहरन, संथन आणि पेरारिवलन) मृत्युदंड आणि उर्वरित (रविचंद्रन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चौघांच्या दयेच्या अर्जावर तामिळनाडूच्या राज्यपालांनी नलिनी यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. उर्वरित आरोपींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी २०११ मध्ये फेटाळला होता.

राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदुर येथे निवडणूक सभेदरम्यान धनू नावाच्या एलटीटीई आत्मघातकी बॉम्बरने हत्या केली. एलटीटीईची महिला दहशतवादी धनू (तेनमोजी राजरत्नम) हिने राजीव गांधींना फुलांचा हार घातल्यानंतर खाली वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि कमरेला बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट केला. हा स्फोट एवढा जोरदार होता की अनेकांचे तुकडे झाले. राजीव गांधी आणि हल्लेखोर धनू यांच्यासह १६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४५ जण गंभीर जखमी झाले.

राजीव यांनी त्यांच्या कार्यकाळात श्रीलंकेत शांती सेना पाठवली होती, त्यामुळे तामिळ बंडखोर संघटना एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम) त्यांच्यावर नाराज होती. १९९१ मध्ये राजीव गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चेन्नईजवळील श्रीपेरंबदुर येथे गेले होते, तेव्हा एलटीटीईने राजीव यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला.