राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते

नांदेड ,१० नोव्हेंबर /प्रतिनिधी :- काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे नेते देखील सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे , राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड,राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या या भारत जोडो यात्रेचा आज 64 वा दिवस आहे. महाराष्ट्रात नांदेडमधून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे.  डॉक्टर, इंजिनिअर, वकील, राजकीय नेत्यांसह खेळाडू देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. 

सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेते  भारत जोडो यात्रेत राहुल गांधीसह पदयात्रा करत आहेत. या यात्रेवर आरोप, प्रत्यारोप टीका सुरु आहे. याचा अर्थ यात्रेची दखल घेतल्या जात आहे. खिल्ली उडवल्या जातंय म्हणजे यात्रा गांभीर्याने घेतली जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले. ‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी, लोकशाहीला बुलंद करणाऱ्या लोकांच्या मनातील एक भावना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली संविधानिक मूल्ये, लोकशाहीची तत्वे यांना प्रथम प्राधान्य देतात. आज देशात जाती धर्मावरून सुरू असलेले ध्रुवीकरण, तोडफोडीचे राजकारण याविरोधात आम्ही खंबीर उभे आहोत असे जयंत पाटील म्हणाले.