भ्रष्टाचा-यांवर कारवाई कोण करणार?-सर्वोच्च न्यायालयाची संतप्त टीका

भ्रष्ट लोक देशाला उद्ध्वस्त करत आहेत

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शहरी नक्षलवाद, भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान देशातील वाढत्या भ्रष्टाचाराबाबत जोरदार टीका केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, भ्रष्ट लोक देशाला उद्ध्वस्त करत आहेत. तसेच ते पैशाच्या जोरावर भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटतात.

गौतम नवलखा यांना न्यायालयीन कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाने ही तोंडी टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असेही म्हटले की, आम्ही असे व्हिडीओ पाहिले आहेत, ज्यात लोक निवडून आलेल्या प्रतिनिधींना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लाच देतात.

महाधिवक्ता एस. व्ही. राजू, राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे हजर झाले, त्यांनी या याचिकेला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, नवलखा यांच्यासारखे लोक देशाला नष्ट करत आहे. त्यावर न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमू्र्ती ह्रषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने तेव्हा म्हटले की, तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे का? जे लोक भ्रष्ट आहेत ते या देशाला नष्ट करत आहेत. तुम्ही प्रत्येक कार्यालयात जाता तेव्हा काय होते? भ्रष्टाचा-यांवर कारवाई कोण करणार? असे प्रश्न न्यायालयाने केले.