वैजापूर तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या 215 जागांसाठी 18 डिसेंबरला मतदान

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूकीच्या रणधुमाळीला येत्या 18 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे.28 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीत ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे ते मतदान प्रक्रिया घेतली जाईल.  ग्रामपंचायतीसाठी सरपंचाची थेट मतदारामधून निवड केली जाणार असल्यामुळे सरपंचपदाची निवडणूक काही ठिकाणी रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी 31 मे 2022 या कालवधीतील मतदार यादी ग्राह्य धरुन अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली आहे. येथील २५ ग्रामपंचायतीचे एकूण 77 प्रभागातील  215 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. 

महालगाव, पानवी बुद्रुक / वक्ती, अव्वलगाव / हमरापूर,  बाबतरा,  बेलगाव , भग्गाव, डागपिंपळगाव, गोळवाडी / मिरकनगर, हनुमंतगाव, हिंगणे कन्नड, हिलालपूर / कोरडगाव, कनकसागज, कविटखेडा /बिरोळा, कोल्ही , खरज / तितरखेडा, खिर्डी हरगोविंदपूर, माळीघोगरगाव, नादी, नांदूरढोक / बाभुळगावगंगा, पाराळा, पुरणगाव, रोटेगाव टुनकी, तिडी / मकरमतपूरवाडी, वांजरगाव असे 25 ग्रामपंचायतीचे एकूण 77 प्रभागातील 215 जागासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

..सरपंचपदाची निवड थेट मतदारातून.. 

25 ग्रामपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमात सरपंचपदाची निवड थेट मतदारांमधून होणार असल्यामुळे निवडणूकीत मोठा उत्साह निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत निहाय सरपंचपदासाठी  आरक्षण निश्चित असल्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांकडून ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक व्यूहरचनेची जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत.