वैजापूर शहरातील अण्णाभाऊ साठे मंगल कार्यालय पाडून बांधलेले व्यापारी संकुल पाडण्यात यावे – मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-पालिकेने शहरातील लाडगाव रस्त्यावर असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंगल कार्यालय पाडून त्या जागेवर उभारलेले व्यापारी संकुल व हॉल पाडण्यात येऊन त्याजागेवर पूर्वीप्रमाणेच मंगल कार्यालय बांधण्यात यावे अशी मागणी मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील लाडगाव रस्त्यावरील न.भु.क्र.2602 या जागेवर पालिकेचे तात्कालीन नगराध्यक्ष स्व.आर.एम.यांच्या कार्यकाळात मातंग समाजासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंगल कार्यालय उभारण्यात आले होते. पालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंगल कार्यालय पाडून त्याजागेवर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आमिष दाखवून मातंग समाजाची दिशाभूल केली व या समाजाला विश्वासात न घेता त्याजागेवर व्यापारी संकुल बांधले त्यामध्ये सहा व्यापारी गाळे व दोन हॉल असून त्याचा ई – लिलाव करण्यात येत आहे. शहर व तालुक्यात मातंग समाजाची लोकसंख्या 20 ते 22 हजार असून या समाजासाठी ईतर दुसरे कोणतेही मंगल कार्यालय नाही.  त्यामुळे मातंग समाजाची दिशाभूल करून उभारण्यात आलेले व्यापारी संकुल पाडून त्याजागेवर पूर्वीप्रमाणे अण्णाभाऊ साठे मंगल कार्यालय उभारून मातंग समाजाला न्याय द्यावा. या निवेदनावर नवनाथ उर्फ रोशन रमेश त्रिभुवन, विजय बाबूलाल त्रिभुवन व चंद्रकांत कारभारी त्रिभुवन यांच्या सह्या आहेत.