मुलीला मारहाण; श्रीरामपूर पोलीस उपअधीक्षकांविरुद्ध याचिका

औरंगाबाद,९ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-श्रीरामपुर (जि. अहमदनगर) येथील पोलीस उपाधिक्षकांनी याचिकाकर्तीच्‍या मुलीला कार्यालयात बोलावून आरोपीकरवी शिवीगाळ करुन बेदम मारहाण करित जखमी केल्याप्रकरणात, मात्र प्रकरणात कोणतीही दाद मिळतनसल्याने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्‍यात आली आहे. याचिकेच्‍या प्राथमिक सुनावणीअंती उपाधिक्षकांच्‍या कार्यालयाच्‍या आवारात घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण नष्‍ट होणार याचि दक्षता घ्‍यावी, ते चित्रण नष्‍ट केल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा म्हणुन वापरण्‍यात येईल असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्‍यायमुर्ती किशोर सी. संत यांनी दिले. बरोबरच प्रतिवादी गृहमंत्रालयासह पोलीस आयुक्त मुंबई, पोलीस अधिक्षक नाशिक व अहमदनगर यांना नोटीस बजावली.

श्रीरामपुर, जि. अहमदनगर येथील उपाधिक्षक यांनी याचिकाकर्त्या महिलेच्‍या मुलीला आपल्या कार्यालयात बोलावून मर्जीप्रमाणे फिर्याद दाखल करण्‍यासाठी स्वतः व कुख्यात आरोपी करवी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. जखमी मुलीला साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येऊन तिचेवर उपचार करण्यात आलेले आहेत. हॉस्पिटलची एमएलसी पाठविल्यानंतरही पोलीस उपाधिक्षक आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला नाही. गुन्‍हा दाखल करण्‍यासाठी अर्ज केल्याने, याचिकाकर्त्‍या महिलेला धमक्या देण्‍यात आल्या, याबाबत याचिकाकर्त्‍या महिलेने पोलीस अधिकांकडे अर्ज केला, मात्र त्‍यांनी याची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे याचिकाकर्त्‍या महिलेने अॅड. शेख मजहर जहागिरदार यांच्‍या मार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

याचिकेच्‍या प्रा‍थमिक सुनावणीअंती न्‍यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. तर अॅड. शेख मजहर यांनी उपाधिक्षक यांच्‍या कार्यालयाच्‍या आवारातील सीसीटीव्हीमध्‍ये कैद पुरावा नष्‍ट करण्‍याची भिती व्‍यक्त केल्याने न्‍यायालयाने सीसीटिव्ही मध्ये कैद चित्रण नष्ट होणार नाही याची दक्षता घेण्‍याचे निर्देश देत, त्‍यातील ते पुरावे नष्‍ट केल्यास तो पोलिसांविरोधात पुरावा म्हणुन वापरण्‍यात येईल असे स्‍पष्‍ट केले.