अ. भा. मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

औरंगाबाद,८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वर्धा येथे होणाऱ्या आगामी ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची आज निवड झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (छायाचित्र -चंद्रकांत थोटे )

आगामी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान विदर्भ साहित्य संघाला मिळाला आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या कर्मभूमीमध्ये होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी गांधी-विनोबांच्या विचारांशी नाळ जोडणाऱ्या साहित्यिकाची निवड केली जावी, अशी मागणी होती. विदर्भ साहित्य संघाच्‍या शताब्‍दी महोत्‍सवान‍िम‍ित्‍त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्‍यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्‍या पत्रकार परिषदेत केली.

आज (मंगळवार) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक वर्ध्यात पार पडली. या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. 

‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा आणि मराठी साहित्याबद्दल मत मांडण्याची मोठी संधी आहे, असं मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय  मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो.’ अशी प्रतिक्रिया नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांची निवड झाल्यानंतर दिली आहे.

निवृत्‍त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांचा परिचय
नरेंद्र चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. चपळगावकर वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. वैचारिक लेखन  करणारे एक संवेदनशील लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यांसारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले असून, त्यांनी अनेक संस्थांवर काम केले आहे.२३ ऑक्टोबर २००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत.न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२ मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. चपळगावकर यांचे अनेक वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले असून ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणे प्रकाशित आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्‍यक्षपद त्‍यांनी भूषविले आहे. भैरुरतन दमाणी पुरस्कारासह त्‍यांना अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

चपळगावकरांची पुस्तके

– अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व

– आठवणीतले दिवस

– कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)

– कायदा आणि माणूस

– कहाणी हैदराबाद लढ्याची

– तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ

– तुमच्या माझ्या मनातलं (ललित)

– त्यांना समजून घेताना (ललित)

– दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)

– नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज

– नामदार गोखल्यांचं शहाणपण

– न्यायमूर्ती केशवराव कोरटकर

– न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)

– मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)

– महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना

– राज्यघटनेचे अर्धशतक

– विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन

– संघर्ष आणि शहाणपण

– समाज आणि संस्कृती

– संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)

– सावलीचा शोध (सामाजिक)

– हरवलेले स्नेहबंध

सन्मान आणि पुरस्कार

– पुण्यात २१-२२ जानेवारी २०१२ रोजी झालेल्या १३व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

– सन २००३ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या माजलगाव शाखेने मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (शिवार साहित्य संमेलनाचे) आयोजन केले होते. माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

– २६ वे मराठवाडा साहित्य संमेलन २००४ साली माजलगाव येथे नवविकास मंडळ शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आले.या संमेलनाचेही अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर होते.

– भैरुरतन दमाणी पुरस्कार (२०११)

– प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (२०१८)

– औरंगाबाद येथे १३-१४ मार्च २०१४ या तारखांना झालेल्या ९ व्या जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुंबई: वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या वैचारिक आणि अभ्यासपूर्ण लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री. चपळगावकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे संयुक्तिकच आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची परंपरा मोठी आहे आणि श्री. चपळगावकर यांच्यामुळे ती अधिक समृद्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.