अब्दुल सत्तारांची जीभ घसरली!मुख्यमंत्र्यांनी केली कानउघडणी!

सुप्रिया सुळेंबद्दल उच्चारले अपशब्द; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यावर म्हणाले, सॉरी…

मंत्री अब्दुल सत्तारांचे सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य; महाराष्ट्रभरातून टीकेची झोड!

औरंगाबाद,७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-  ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ’, असे वादग्रस्त वक्तव्य करून कृषिमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मुंबईत सत्तारांच्या घरावर दगडफेक करत घराच्या काचा फोडल्या. तर काही ठिकाणी सत्तारांच्या बॅनरला फटके मारत प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

सत्तार यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर दगडफेक केली, तसेच मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. राष्ट्रवादीकडून सत्तार यांनी माफी मागावी. तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करून त्यांची कान उघडणी केल्याची माहिती मिळते आहे. यावेळी त्यांनी सत्तार यांना त्यांच्या वक्तव्यावर माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावून बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधू नये, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि बलात्कारी आरोपीला वाचवणाऱ्या रवींद्र चव्हाण या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा त्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मुंबई येथील शासकीय निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सत्तारांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनी अब्दुल सत्तार यांना २४ तासांत शब्द मागे घेत माफी मागावी, असा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख यांनी सत्तार यांचे पुतळे महाराष्ट्रभर जाळू म्हणत आक्रमक भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होताच, अब्दुल सत्तार यांनी कुणाची मने दुखवले असतील, तर सॉरी म्हणत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची एका वृत्तवाहिनीशी बोलताना जीभ घसरली. सत्तार म्हणाले की, ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत. ‘इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ. आमचे खोके आणि त्यांचे डोके तपासावे लागेल. ज्यांना खोक्याची आठवण येऊ लागली आहे, त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये दवाखाना उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके-खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो’, असे सत्तार म्हणाले.

दरम्यान, प्रकरण पेटताच सत्तारांनी सॉरी म्हणत मी कोणाबद्दलही काही बोललो नाही. कोणत्याही महिलांची मने दुखावली असे बोललो नाही. कोणाला वाईट वाटले असेल, तर मी खेद व्यक्त करतो, म्हणत माफी मागितली. मी फक्त खोक्याबद्दल बोललो. महिलांबद्दल एक शब्दही बोललो नाही. पुढेही बोलणार नाही. मी महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. सॉरी, असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मंत्र्यांना वाट्टेल ते बोलायची हमी दिलीय का?आ.सतीश चव्हाण यांचा सवाल

नसेल तर मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खा.सुप्रियताई सुळे यांच्याबद्दल आज केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक, खेदजनक आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरूध्द वाट्टेल ते बोला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना हमी दिली आहे का?, अशी हमी दिली नसेल तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून केली आहे.

          खरे तर महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाते. मात्र सध्याच्या सरकारमधील मंत्रीच अशी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेने घाली घालवत आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत खा.सुप्रियाताई सुळे महिलांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडत असतात. महाराष्ट्रातील महिलांचा त्या देशपातळीवरील आवाज आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सुप्रियाताईंना अनेक वेळा संसदरत्न म्हणून सन्मानित केले गेले. महिलांच्या सन्मानासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या खा.सुप्रियाताई सुळे यांना आदरणीय शरद पवार साहेबांच्या कन्या म्हणून सर्वच ओळखतात मात्र त्यापुढे जाऊन स्व-कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपली स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अशा व्यक्तीबद्दल बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ धजावलीच कशी?, एका जबाबदार मंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभते का?, त्यांची भाषा म्हणजे खोके आणि सत्तेतून आलेला माज आहे. महिला लोकप्रतिनिधीबद्दल एक जबाबदार मंत्रीच अशी भाषा वापरत असेल तर सामान्य महिलांच्या मान-सन्मानाची अपेक्षा या सरकारकडून करायची तरी कशी? संस्कृती आणि हिंदुत्वाची भाषा करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना असली भाषा मान्य आहे का?, असे प्रश्न आ.सतीश चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत. तसेच अब्दुल सत्तार यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांची जाहीर माफी मागावी असे देखील आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.