कोविड-१९ वैद्यकीय सेवेसाठी चार हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर, दि. 31 : महाराष्ट्रातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सद्यःपरिस्थितीत तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार असून सुमारे चार हजार डॉक्टर्स सध्याच्या कोविडजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ.संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

नाशिक येथील आरोग्यविज्ञान विद्यापीठामार्फत नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी 2019 मध्ये घोषित करण्यात आला होता. यात सुमारे चार हजार विद्यार्थी एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. या विद्यार्थ्यांची इंटर्नशिप एक मार्च 2019 ते 28 फेब्रुवारी 2020 दरम्यान पूर्ण झाली आहे. इंटर्नशिप पूर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. पदवीदान समारंभाची वाट न पाहता या विद्यार्थ्यांना तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याने हे विद्यार्थी वैद्यकीय सेवेत दाखल होण्यास पात्र ठरणार आहेत.

सध्याच्या परिस्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध  होणार असल्याने आरोग्य सेवेवरील ताण कमी होण्यास मदत होईल असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *