अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा रमेश लटके विजयी

महालगाव येथे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष

मुंबई उपनगर, ६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण 66,530 मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके  विजयी झाल्या आहेत अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर श्री. पाटील यांनी विजयी उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ५८८७५ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नोटाला ११५६९ इतकी मत मिळाली आहेत.

या वर्षी मे महिन्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे आवश्यक असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान ३ नोव्हेंबर रोजी झाले. त्यात ३१.७४ टक्के कमी मतदान झाले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याने रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके या आरामात विजयी होतील अशी अपेक्षा होती.

अंधेरी पूर्व’ या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 256 केंद्रांवर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण 31.75 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण 19 फेऱ्यांमध्ये ई.व्ही.एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तात्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘166 – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९ व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून  उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:

१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (पक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३०

२) श्री. बाला व्यंकटेश नाडार (पक्ष – आपकी अपनी पार्टी ) : 1,515

३) श्री.मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : 900

४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष ) : 1,531

५) श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : 1,093

६) श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष ) : 624

७) श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : 1,571

(नोटा : 12,806, अवैध मते 22)

एकूण मते : 86,570

—————–

मशाल भडकली असून भगवा फडकला -उद्धव ठाकरे

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला. सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गटाची मशाल चिन्हावर ही पहिलीच निवडणूक होती. या विजयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले की, “कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे.” विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” या निवडणुकीमध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली. यावर त्यांनी म्हंटले की, “आमचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. ज्यांच्या मागणीवरुन गोठवले ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मते त्यांना मिळाली असती. नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

महालगाव येथे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा जल्लोष

वैजापूर, ६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा  लटके यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल

वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदार संघाच्यावतीने रविवारी (ता.6) तालुक्यातील महालगाव येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख डॉ.प्रकाश शेळके,  शाखाप्रमुख राजेंद्र पाटील हुमे,  दत्तू पाटील खपके, उपशाखाप्रमुख भरत गुंड, बाबासाहेब नवनिधे, पुंजाराम पाटील काळे, चार्लस दादा आल्हाट,भागीनाथ जाधव, सुनील आल्हाट, प्रकाश आल्हाट, कैलास पाटील शेळके, संपत जाधव, तुकाराम आहेर, गणेश शेळके, आप्पासाहेब काळे, किरण आल्हाट, विजय आल्हाट, राभाजी आल्हाट, नानासाहेब संकपाळ, विशाल शेळके, अमोल पाटील मलिक, भानुदास काळे, आसाराम गंडे, गणपत आल्हाट, नंदू जाधव, नंदू शेळके, संतोष गायकवाड, सिद्धार्थ जाधव, भागचंद बाबा सरोदे, समाधान खरे, राजू पाटील गलांडे, योगेश  मोहिते यांच्यासह ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी शिवसैनिक, युवासैनिक, भीमसैनिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.