ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

नवी दिल्ली, 
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे अध्वर्यू पद्म विभूषण पंडित जसराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेतील न्यू जर्सी येथे त्यांची प्राणज्योत मावळली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० साली पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरवल होते. ‘ही ईश्वरी कला जनसामान्यांपर्यंत नेणारे आम्ही फक्त त्या ईश्वरी शक्तीचे दूत आहोत असे पं. जसराज मानत.

पं.जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. शास्त्रीय संगीतातील मेवाती घराण्याचे तपस्वी गायक अशी पंडित जसराज यांची ओळख होती. पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० साली झाला. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच त्यांनी वडील पंडित मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते. गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले.

पंडित जसराज यांच्या नावाने अंतराळात एक ग्रहसुद्धा आहे. आंतरराष्ट्रीय संघाने मंगळ आणि गुरू ग्रहांच्यामध्ये असलेल्या एका ग्रहाचे नाव पंडित जसराज असं ठेवलं आहे. असा मान मिळवणारे ते पहिले भारतीय कलाकार आहेत.

Header media

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंडितजी जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत!मुख्यमंत्री ठाकरे यांची पंडित जसराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि 17 : पंडित जसराज नावाचा तारा संगीत क्षेत्रातून निखळला आहे यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात जणू अंध:कार पसरला आहे. स्वर्गीय संगीताचा आनंद पंडितजींनी या भूतलावरील प्रत्येक कणाकणांना दिला. आता ते जुगलबंदीसाठी स्वर्गस्थ झाले आहेत, अशा भावपूर्ण शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात की, पंडितजी हे गायक म्हणून जितके थोर होते, तितकेच मनुष्य म्हणूनही महान होते. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, हास्य हे त्यांच्या गळ्यातून निघणाऱ्या सुरांइतकेच दिलखुलास होते. पृथ्वीवरील सातही महाद्विपांवर सुरांची बरसात करणारे ते एकमेव गायक होते. त्यांच्या सन्मानार्थ एका ग्रहाचं नाव नासाने ‘पंडित जसराज’ असे ठेवले, हा या देशाचा बहुमानच म्हणायला हवा.

पंडितजी जुगलबंदीचे बादशहाच होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, जिथे जिथे सूर्याची किरणे पोहोचत होती तेथे तेथे पंडितजींचे सूर पोहचले होते. अण्टार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर पंडितजींचं गायन झालं होतं. आकाश आणि जमिनीचा कण न् कण त्यांच्या सुरांच्या बरसातीत न्हाऊन निघाला आहे. पंडितजी फक्त शरीराने आपल्यातून गेले. त्यांची गायकी, त्यांचे सूर हे अनंत काळपर्यंत आपल्या हृदयात राहतील.

शिवसेनाप्रमुखांशी ऋणानुबंध

पंडितजींचा जन्म हरयाणात झाला असला तरी त्यांचे संगीताचे कार्य घडविण्यात महाराष्ट्राचा हातभार आहे. पंडितजी महाराष्ट्राचे जावई होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पंडितजींशी ऋणानुबंध होता. मलाही पंडितजींचा स्नेह लाभला. महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेतर्फे मी त्यांना विनम्र आदरांजली वाहत आहे व त्यांच्यापुढे नतमस्तक होत आहे, अशा भावोत्कट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

“भारतीय शास्त्रीय संगीत नि:शब्द झालंय…”
पंडित जसराज यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 17 :- “महान शास्त्रीय गायक, पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय संगीत नि:शब्द झाले आहे. ऐंशी वर्षांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारा स्वर शांत झाला आहे. पंडीत जसराज यांनी भारतीय संगीत समृद्ध केलं. देशविदेशात लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचं निधन ही भारतीय शास्त्रीय संगीत जगताची मोठी हानी आहे. त्यांचं ध्वनिमुद्रीत गायन, संगीत अनेक पिढ्यांना शास्त्रीय संगीताचा आनंद देत राहील. त्यांचा स्वर आणि आकाशमंडलातील ताऱ्याला दिलेलं नाव यामुळे ते अनंतकाळ रसिकांच्या स्मरणात राहतील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *