‘कामाला लागा, राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्पष्ट आदेश

मुंबई,५ नोव्हेंबर /प्रतिनिधी :- अवघ्या काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडत भाजपसमवेत राज्यात स्वतःचे सरकार आणले.यानंतर महाराष्ट्राने एक अनोखा सत्तासंघर्ष पाहिला. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उलथापालथ होते का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले, अशी माहिती देण्यात आली आहे.

दादरमधील शिवसेना भवनामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठमोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपण प्रत्येकाच्या घराघरात पोहचलो पाहिजे. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यामध्ये मध्यवधी निवडणुका लागतील, त्यासाठी तयार राहा. तर, आमदार मनीषा कायंदे यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, “केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात.”

मागील 3 महिन्यांचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील 4 मोठे प्रकल्प हे गुजरातला गेले आहे. राज्यातील लोकांना विश्वास देण्यासाठी मोदींनी दोन पॅकेजची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले पाहिजे, सर्वांनी तयारीला लागावे, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दिली.