औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा-आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

औरंगाबाद,३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

        आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाडा सातत्याने अतिवृष्टीचा सामना करीत आहे. यंदा देखील या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्याला बसला असून सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील 19 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. प्रामुख्याने औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांना परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला असून बळीराजा हवालदिल झाला आहे. यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 426 हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे तसेच मागील दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 4 लाख 93 हजार 732 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खरिपाचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले असून यामध्ये कापूस, मका, सोयीबीन, तूर, मूग आदी पिकांचा समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाने आदेश दिले असले तरी अद्यापही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार?, अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गांमधून उपस्थित केला जात आहे. अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतीसाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. पावसाने हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला गेल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे.

शासनाने तातडीने औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानपोटी सरसकट शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.