हमरापूर शिवारात दरोडेखोरांचा धुमाकूळ ; मारहाण करून दागिन्यासह रोख रक्कम पळवली

वैजापूर, ३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील हमरापूर शिवारात दरोडेखोरांच्या सहा जणांच्या टोळीने मंगळवारी मध्यरात्री धुमाकुळ घातला. तीन वेगवेगळ्या घरात चाकुचा धाक दाखवुन व मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. त्यामुळे हमरापूरसह परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

मागील पंधरा दिवसांतच चेंडुफळ व लाडगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकास लुटल्याची घटना ताजी असतानाच हमरापूर शिवारात घडलेल्या या घटनेने विरगाव पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. हमरापूर शिवारात कमलाबाई या घरात एकटे असल्याचा फायदा घेऊन घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसले व त्यांनी चाकूचा धाक दाखवत ५ ग्रॅम सोने व अकरा हजार रुपये घेऊन पळ काढला. त्यानंतर शेजारच्या गट क्रमांक 75 मधील भाऊसाहेब गायकवाड यांच्या घरात घुसुन त्यांना लोखंडी सळीने मारहाण केली व हत्यारांचा धाक दाखवून घरातील पत्नीची पोत, कानातील झुंबर असे एकूण अंदाजे तीन तोळे सोने काढून घेतले व रोख 25 हजार रुपये चोरले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या लहान भावाकडे त्यांनी मोर्चा वळवला. बाबासाहेब गायकवाड यांना चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी त्यांच्या आई-वडिलांना जबरदस्त मारहाण केली. तिथून चोरांनी पळ काढला व गट क्रमांक 66 मध्ये शेषराव माधवराव चौधरी यांच्या वस्तीमध्ये घुसुन दिड तोळ्याची सोन्याची पोत व  पेटीतील पैसे व सोने काढून घेतले व तिथून एक पसार झाले.

विरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय शरदचंद्र रोडगे यांनी घटनेची माहिती घेऊन स्पॉर्ट पंचनामा केला तसेच श्वान पथकाला पाचारण केले. फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांची देखील टीम या ठिकाणी हजर होती. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.