जादूटोण्याच्या संशयातून ४३ व्‍यक्तीच्‍या डोक्यात फावड्याचा दांडा: आरोपीला पोलिस कोठडी 

औरंगाबाद,२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-जादूटोण्याच्या संशयातून ४३ व्‍यक्तीच्‍या डोक्यात फावड्याचा दांडा घालून जीवे ठार मारणारा आरोपी सद्दाम सय्यद सिराज सय्यद (२२, इगदाह मोहल्ला, निवन बसस्‍टॅण्‍ड, ता. घनसावंगी जि. जालना, ह.मु. शिक्षक कॉलनी, रांजणगाव शे.पुं ता. गंगापुर) याच्‍या पोलिस कोठडीत ५ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.जी. गुणारी यांनी बुधवारी दि.२ नोव्‍हेंबर रोजी दिले.

मयत कारभारी शेंबडे (४३, रा. घोणशी खुर्द ता. घनसावंगी जि. जालना) हा जादूटोणा करायचा आणि त्याने केलेल्या जादूटोण्यामुळेच आपल्या व्यवसायात नुकसान झाल्याचा आरोपी सद्दामला संशय होता. संशयापायी कारभारीला कायमचे संपवण्याचा निर्णय त्‍याने घेतला. २५ ऑक्टोबरला कारभारीला फोन करून एका महिलेला मुलबाळ होत नसून, तिला जडीबुटी देण्याचे कारण सांगुण सद्दामने कारभारीला रांजणगाव- कमळापुर येथे बोलावून घेतले. त्‍यानंतर सद्दामने कारभारील याला दारु पाजली व दुचाकीवरून मिटमिटा शिवार येथील रेल्वे रुळाजवळ नेले. तेथे सद्दामने डोक्यात फावड्याचा दांडा व दगड घालून कारभारीचा खून केला. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपीच्‍या पोलिस कोठडी दरम्यान पोलिसांनी मयताच्‍या मोबाइलचे कव्‍हर, मोबाइल बॅटरी, सिमकार्ड, कपडे, बुट, रक्ताचे डाग पसुलेला कपडा, दुचाकी (क्रं. एमएच-२०-एएन-३४९१) असा ऐवज हस्‍तगत केला.

आरोपीच्‍या कोठडीत ५ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ

कोठडीची मुदत संपल्याने आरोपी सद्दाम सय्यद याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील उध्‍दव वाघ यांनी आरोपीने हा मयताला ज्या रस्त्‍याने घेवून फिरला त्‍या रस्‍त्‍यावरील सीसीटीव्‍ही चित्रणतपासयाचे आहे. गुन्‍ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीच्‍या पोलिस कोठडीत ७ दिवसांची वाढ करण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.