भारतातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातील पहिली दोनशे प्रवासी क्षमता असलेल्या हाय स्पीड वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आज मुंबईत झाला. या वॉटर टॅक्सीची मुंबई डोमेस्टिक क्रुज टर्मिनल्स ते मांडवा पहिली सफर करण्यात आली. आजपासून या वॉटर टॅक्सीच्या रोज सहा फेऱ्या होणार असून सर्व सोयी सुविधा युक्त आरामदायी आणि जलद प्रवासासाठी ही वॉटर टॅक्सी महत्वाची ठरणार आहे.

भारतातील पहिली २०० प्रवासी क्षमता असलेली नवीन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नयन इलेव्हन हाय स्पीड वॉटर टॅक्सी आहे. या वॉटर टॅक्सीच्या प्रवासाचा आजपासून शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवसापासून प्रवाशांनी या वॉटर टॅक्सीचं बुकिंग सुरू केलं आहे. त्यानुसार, वॉटर टॅक्सीतून प्रवासी या डोमेस्टिक क्रूज टर्मिनसपासून ते मांडवा अशी पहिली सफर करू शकतील.

मुंबईत नव्याने सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा स्पीड १६ नोडस प्रति तास आहे. या वॉटर टॅक्सीमध्ये २०० जणांची आसनक्षमता आहे. इतकी गर्दी असूनसुद्धा टॅक्सीच्या बाहेरील समुद्राची दृश्य अगदी आरामात पाहता येतात. या टॅक्सीमुळे प्रवासी अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत मांडवापर्यंत प्रवास पूर्ण करू शकणार आहेत.