दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) (मुख्य) परीक्षा-२०२१ निकाल जाहीर

मुंबई,१ नोव्हेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ०२ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) (मुख्य) परीक्षा-२०२१ चा निकाल उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्याय निर्णयांच्या अधीन राहून आयोगाने प्रसिद्ध केला  आहे.

या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तसेच तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. उमेदवारांनी आवेदन पत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीचे वेळी न केल्यास, तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तपासताना वा अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी, कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.

सदर निकालानुसार अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. मुलाखत पत्रे संबंधित उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. अत्यंत अपरिहार्य कारणाशिवाय मुलाखतीचा दिनांक बदलून देण्याची विनंती मान्य केली जाणार नाही. उमेदवारांनी मुलाखतीस येताना मुलाखत पत्राची प्रत घेऊन येणे व त्यातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मुलाखतीच्या वेळेस अर्जात दावा केल्याप्रमाणे पृष्ठ्यर्थ आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे / सर्व वर्षांची गुणपत्रके / निगडीत असणारी विहित प्राधिकाऱ्यांनी दिलेली अनुभव प्रमाणपत्रे इ. सादर करणे अनिवार्य आहे. त्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही व अशा उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही याची कृपया संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मुख्य परीक्षेमधून मुलाखतीकरीता अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन विहित पद्धतीने अर्ज करणे आवश्यक असल्याचे लोकसेवा आयोगाचे उप सचिव यांनी सांगितले आहे.