वैजापूर तालुक्यात 82 हजार 262 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

111 कोटी 87 लाख 63 हजार रुपये मदतीची प्रशासनाची शासनाकडे मागणी

जफर ए. खान

वैजापूर, १ नोव्हेंबर :-वैजापूर तालुक्यात गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या गारपीट व अतिपावसामुळे खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. तालुक्यात 1 लाख 35 हजार 182 शेतकऱ्यांच्या 82 हजार 262 हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे नुकसान झाले आहे.

13 हजार 600 रुपये हेक्टरप्रमाणे 111 कोटी 87 लाख 63 हजार 200 रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून मदत कधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार तालुक्यात 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या जिरायत पिकांखालील बाधित क्षेत्र 82 हजार 262 हेक्टर असून सप्टेंबर महिन्यात 25 हजार 670 शेतकऱ्यांचे 11 हजार 021 क्षेत्रातील तर ऑक्टोबर महिन्यात 1 लाख 09 हजार 512 शेतकऱ्यांचे 71 हजार 241 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन, कापूस, उडीद, मका, बाजरी, तूर, मूग या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक बाधित क्षेत्र जिरायतीचे हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे  मोबदल्यासाठी 111 कोटी 87 लाख 63 हजार 200 रुपयांची मदत अपेक्षित आहे. अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.