व्यापाऱ्यावर टोच्‍या आणि सुऱ्याने  प्राण घातक हल्ला : दोघा आरोपी भावांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा

औरंगाबाद,१ ​नोव्हेंबर​ /प्रतिनिधी :- जुन्‍या भांडणाच्‍या कारणावरुन दोघा भावांनी व्‍यापाऱ्यावर टोच्‍या आणि सुऱ्याने  प्राण घातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते.या  प्रकरणात दोघा आरोपी भावांना दहा वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दहा हजार रुपयांचा दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.एम. कोचे यांनी ठोठावली. शेख इरशाद शेख इब्राहीम (२९) आणि शेख एजाज शेख इब्राहीम (३०, दोघे रा. अल्तमश कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे आरोपी शेख इरशाद व एजाज हे दोघे भाऊ सराईत असून इरशाद विरोधात जिल्हा व सत्र न्‍यायालयात सहा खटले दाखल होते. त्‍यातील तीन खटल्‍यात इरशाद याला शिक्षा लागली असून तीन खटले न्‍यायालयात सुरु आहेत. तर एजाज विरोधात चार ते पाच खटले जिल्हा न्‍यायालयात सुरु आहेत.

प्रकरणात याकुब खान अयुब खान (४०, रा. रहीमनगर, आझाद चौक) यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २ ऑक्‍टोबर २०१२ रोजी सकाळी सव्‍वा आठ वाजेच्‍या सुमरास फिर्यादी हे घरी असतांना, दोन व्‍यक्ती त्‍यांच्‍याकडे आले व तुमचा भाऊ अजीम याला सेंट्रल नाका येथे काही लोक मारहाण करित असल्याचे सांगितले. फिर्यादीने सेंट्रल नाका गाठला असता, तेथे अजीम हा जखमी अवस्‍थेत होता, फिर्यादी त्‍याला रिक्षातून उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात नेत होते. त्‍यावेळी अजीम यांनी सांगितले की, १ ऑक्‍टोबर २०१२ रोजी अजीमचे शेख एजाज याच्‍याशी भांडण झाले होते. २ ऑक्‍टोबर २०१२ रोजी सकाळी आठ वाजेच्‍या सुमारास अजीम हा सेंट्रल नाका परिसरात असतांना तेथे आरोपी शेख इरशाद, शेख एजाज, शेख परवेज आणि सय्यद वसीम (दोघे रा. बायजीपुरा) तेथे आले. त्‍यांनी तु रात्री एजाजला का मारले म्हणत अजीमला शिवीगाळ केली. तर आरोपी शेख इरशाद याने टोच्‍या अजीमच्‍या पोटात भोसकला तर एजाज ने सुऱ्याने  अजीमच्‍या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. या  प्रकरणात जिन्‍सी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन सहायक निरीक्षक एम.डी. उस्‍मान यांनी दोषारोपपत्र दाखल केले. 

खटल्याच्‍या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपी शेख इरशाद हा सराईत असून त्‍याला यापूर्वी दाखल खून आणि मोक्काच्‍या गुन्‍ह्यात जन्‍म ठेपे तर अन्‍य एका गुन्‍ह्यात तीन वर्षांची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायालयाने ठोठावलेली असल्याचे अॅड. बांगर यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन देत, आरोपीची पार्श्‍वभूमी पाहता आरोपीला जास्‍तीत जास्‍त शिक्षा देण्‍यात यावी अशी विनंती न्‍यायालयाकडे केली. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपी शेख इरशाद आणि शेख एजाज या दोघा भावांना भादंवी कलम ३०७ आणि ३४ अन्‍वये १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी १० हजार रुपयांचा दंड तसेच कलम ३२३ अन्वये एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात अॅड. बांगर यांना अॅड. अभिमान करपे यांनी सहाय्य केले.