दुधाचे दर वाढण्याची शक्यता; दूध संघांची पुण्यात बैठक

पुणे : सध्या अनेक दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांकडून जास्तीच्या दराने दूध खरेदी करतात, त्याचा परिणाम दरवाढीवर होणार असल्याची शक्यता आहे. बैठकीत उपस्थित सदस्यांनी दूध खरेदीचे दर वाढवण्याची मागणी केली आहे. आज राज्यातील विविध दूध संघांची बैठक पुण्यातील कात्रज येथे पार पडत आहे.

पुण्यातील कात्रज येथील दूध डेअरीमध्ये शासकीय आणि खाजगी दूध उत्पादन संघांची बैठक पार पडत आहे. अमूल सारख्या कंपन्या जास्त दराने दूध खरेदी करत असल्यामुळे आपल्यालाही आगामी काळात दूध खरेदीचे दर वाढवावे लागतील, अशी चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आगामी काळात दूध दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनेही दूध उत्पादक कंपन्यांना मदत करावी, अशा प्रकारची मागणी या बैठकीत करण्यात आली.

देशातील अनेक राज्यात लम्पी स्कीन आजार पसरला आहे. महाराष्ट्रातही विविध जिल्ह्यात जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. लम्पी आजारामुळे पशुधन कमी झाल्याने दूध टंचाई निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे दुधाचे दर आणखी वाढू शकतात.