आवडत्या व्यक्तीपासून बाळाला जन्म देण्यास हरकत काय? जया बच्चन यांचे धाडसी विधान

नव्या नवेली नंदा हिने सुरू केलेल्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला त्यांनी नुकतीच भेट दिली होती.

मुंबई,​३०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- लग्न न करता आपली नात आई झाली तरी माझी हरकत नाही. कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक आकर्षण आणि शारीरिक संबंध खूप महत्त्वाचे असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या बाळाला जन्म देण्यास हरकत काय, असे धाडसी विधान अभिनेत्री जया बच्चन यांनी केले आहे.

जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने सुरू केलेल्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट चॅनलला त्यांनी नुकतीच भेट दिली होती. यावेळी जया बच्चन यांनी आपली बिनधास्त मते व्यक्त केली. या निमित्ताने बच्चन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र दिसल्या. ‘‘नाते अधिक काळ टिकण्यासाठी शारीरिक संबंध गरजेचे आहे, ’’ असे पॉडकास्टमध्ये नात नव्या हिच्याशी बोलताना जया म्हणाल्या. ‘‘कदाचित लोक माझे वक्तव्य आक्षेपार्ह म्हणतील, पण माझ्या मते, कोणतेही नाते दीर्घकाळ टिकण्यासाठी शारीरिक संबंध आणि शारीरिक आकर्षण हे खूप महत्त्वाचे असते.’’

जया म्हणाल्या, ‘‘नव्या लग्नाशिवाय आई झाली तरी काहीच अडचण नाही. माझी पिढी असो की श्वेताची, आम्ही याचा विचारही करू शकत नव्हतो, पण जेव्हा नव्याच्या वयाची मुलं या अनुभवातून जातात, तेव्हा त्यांना कुठेतरी अपराधी वाटते, हे पाहून खूप वाईट वाटते.’’ नव्याला संबोधून जया म्हणाल्या, ‘‘मी याकडे वैद्यकीयदृष्ट्या पाहते. सध्या सर्वत्र भावनाशून्य लोक पाहायला मिळतात. माझ्या मते, तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करायला हवे. ती व्यक्ती तुला फार प्रिय आहे. परिणामी त्या व्यक्तीला ‘मला तू आवडतोस म्हणून मला तुझ्या बाळाला जन्म द्यायला आवडेल’ असे म्हणू शकतेस, पण याउलट आपल्याकडे मला तू आवडतोस म्हणून लग्न करूया, असे शिकवले जाते. लग्न न करता तुला बाळ झालं, तरी मला चालणार आहे,’’ असे जया म्हणाल्या.

नाते टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची

जया बच्चन म्हणाल्या, ‘‘आत्ताची पिढी पार्टनरसह त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रयोग करत आहेत. आमच्या काळात असे करण्याची मुभा नव्हती. नाते टिकण्यासाठी शारीरिक जवळीक गरजेची असते. त्याशिवाय त्या नात्याला काहीच अर्थ राहणार नाही. फक्त प्रेम, मोकळीक आणि समजूतदारपणा दाखवून नाते टिकणे अवघड असते,’’ असे त्यांनी सांगितले.