लॉकडाऊनच्या काळात सायबरचे ४४६ गुन्हे दाखल, २३८ लोकांना अटक

मुंबई दि. 31 : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात 446  गुन्हे दाखल झाले असून 238 व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 30 मे पर्यंत एकूण 446 गुन्ह्यांची (ज्यापैकी २६ N.C. आहेत) नोंद  झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले, तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 186 गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 176 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 23 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 8 गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 238 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 105 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे.

पुणे ग्रामीण

पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात एका गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यामुळे या पोलीस विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 37 वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या व्हाट्सॲपद्वारे कोरोना महामारीबाबत चुकीच्या आणि खोट्या माहितीचा मजकूर असणाऱ्या आशयाची पोस्ट, विविध व्हाट्सॲप ग्रुपवर शेअर केली होती. त्यामुळे परिसरातील लोकांच्या मनात संभ्रम उपसस्थित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

स्पर्धात्मक परीक्षा प्रसिद्ध क्लासेसच्या नावांनी फेक लिंक्स

सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच विद्यार्थी घरी बसूनच अभ्यास करत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये  विविध स्पर्धात्मक परीक्षांची जसे की एमपीएससी, यूपीएससी, आयआयटी-जेईई, गेट (GATE), कॅट (CAT) इत्यादींची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. सध्या सायबर भामट्यांनी या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करून घेणाऱ्या प्रसिद्ध क्लासेसच्या नावांनी बऱ्याच फेक लिंक्स बनविल्या आहेत व त्या सोशल मीडियावर विविध प्रकारे प्रसारित देखील केल्या आहेत. त्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांकरिता लागणारे, विविध प्रॅक्टिस पेपर्स, अभ्यासाच्या टिप्स, अनुभवी मार्गदर्शकांकडून, मार्गदर्शन अत्यंत अल्प व माफक दारात उपलब्ध आहे. सदर लिंकवर क्लिक करून, तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स भरा व पैसे (payment करा) भरा, त्यानंतर तुम्हाला या सर्व अभ्यास साहित्याच्या पाहण्यासाठी लॉगइन आयडी (login id) व पासवर्ड कळविला जाईल, अशा आशयाचा मेसेज असतो व लिंक असते. विद्यार्थ्यांना भुरळ पाडण्यासाठी अशा मेसेजमध्ये हे देखील नमूद असते की एका विशिष्ट कालावधीत नोंदणी  केली तर विद्यार्थ्यांना नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईमचे तीन महिन्याचे सबस्क्रिप्शन फुकट मिळेल.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेष करून अशा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विनंती करते की, कृपया आपण अशा लिंक व मेसेज पासून सावध राहा. आपण कोणीही असा मेसेज वाचून त्या मोहाला बळी पडू नका. असा मेसेज ज्या क्लासच्या नावाने आला असेल त्या क्लासच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सदर मेसेजची सत्यता पडताळून बघा किंवा त्या क्लासच्या संपर्कासाठी नमूद केलेल्या फोन नंबरवर आधी फोन करून सदर बाबत सर्व माहिती घ्या व मगच निर्णय घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *