एका खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश:जीवे ठार मारल्याची कबुली  

आरोपी सद्दाम सय्यदच्‍या मुसक्या आवळल्या

औरंगाबाद,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- दिवाळीत शहरात झालेल्या दोनपैकी एका खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. जादूटोण्याच्या संशयातून दारू पाजल्यानंतर त्‍या व्यक्तीच्‍या डोक्यात फावड्याचा दांडा घालून जीवे ठार मारल्याची कबुली आरोपीने दिली आहे. कारभारी सिद्धू शेंबडे (४३, रा. घोणशी, ता. घनसावंगी, जि. जालना) असे मयताचे तर, सद्दाम सय्यद सिराज सय्यद (२२, रा. इगदाह मोहल्ला, निवन बसस्‍टॅण्‍ड, ता. घनसावंगी जि. जालना, ह.मु. शिक्षक कॉलनी, रांजणगाव शे.पुं ता. गंगापुर) असे आरोपीचे नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

पाडव्याच्या दिवशी औरंगाबाद शहरात खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. त्यापैकी एका घटनेत मिटमिटा परिसरातील रेल्वेरुळाच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. या घटनेत संबंधिताच्या डोक्यात जबर मारहाण करण्यात आल्याचे दिसत होते. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनास्‍थळावरून लाकडी दांडा, रक्ताने माखलेला दगड, रक्तमिश्रीत माती, मयत शेंबडे यांच्‍या पॅन्‍टच्‍या खिशातून ३० रुपये रोख आणि दोन आयुर्वेदिक पुड्या असा ऐवज जप्‍त केला. तपास सुरु असतांना संशयित आरोपी वाळूज भागातील रांजणगाव- कमळापुर येथील असून, त्याचे फर्निचरचे दुकान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी दि.२७ रात्री साडेसात वाजेच्‍या सुमारास आरोपी सद्दाम सय्यदच्‍या मुसक्या आवळल्या.

असा रचना प्लॅन

चौकशी दरम्यान आरोपीने खुनाची कबुली दिली. कारभारी शेंबडे हा आरोपीच्‍या सासुरवाडी असलेल्या घोणशी येथील असल्याने त्यांची ओळख होती. कारभारी जादूटोणा करायचा आणि त्याने केलेल्या जादूटोण्यामुळेच आपल्या व्यवसायात नुकसान झाल्याचा सद्दामला संशय होता. संशयापायी कारभारीला कायमचे संपवण्याचा निर्णय त्‍याने घेतला. २५ ऑक्टोबरला कारभारीला फोन करून एका महिलेला मुलबाळ होत नसून, तिला जडीबुटी देण्याचे कारण सांगुण सद्दामने कारभारीला रांजणगाव- कमळापुर येथे बोलावून घेतले. कारभारी हा त्याचा भाचा सुनील व सुनीलचा मावस भाऊ दिनेश पवार यांच्यासोबत कारने कमळापुर फाटा येथे आले. आरोपी तिघांना भेटल्यानंतर त्‍याने कारभारी चार-पाच दिवसांनी येईल, तुम्ही जा असे सांगून सुनिल व दिनेश या दोघांना परत पाठवले.

डोक्यात लाकडी दांडा, दगड घालून खून

सायंकाळी सद्दाम व कारभारी हे दोघे दारु प्‍यायले. सद्दामने कमळापुर येथील हार्डवेअर दुकानावरून फावड्याचा दांडा विकत घेतला. मग ते दोघे दुचाकीवरून मिटमिटा शिवार येथील रेल्वे रुळाजवळ गेले. तेथे सद्दामने डोक्यात फावड्याचा दांडा व दगड घालून कारभारीचा खून केला. त्‍यानंतर अरोपीने कारभारीचा मोबाइल फेकून देत तेथून धूम ठोकली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीला २ नोव्‍हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपी सद्दाम सय्यद याला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी आरोपीने गुन्‍ह्यात वापरलेली मोबाइल, दुचाकी आणि मयताचा फेकलेला मोबाइल जप्‍त करायचा आहे. गुन्‍हा करतेवेळी आरोपीने परिधान केलेले कपडे हस्‍तगत करायचे आहेत. गुन्‍ह्यात आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.ही विनंती मान्‍य करुन प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी एस.एस. छल्लाणी यांनी आरोपीला २ नोव्‍हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले.